Thane traffic : घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात रासायनिक टँकरचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. सुमारे चार तासानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यामधून बाजूला करण्यात यश आले. या टँकरमध्ये रासायनिक पदार्थ होते. रासायनिक टँकरमधील रसायन बाहेर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.
नवी मुंबई येथून रासायनिक टँकर गुजरातच्या दिशेने निघाला होता. टँकरमध्ये १६ टन प्रोपिलीन गॅस (Propylene Gas) हे रासायनिक पदार्थ होते. हा टँकर घोडबंदर (Ghodbunder road) मार्गावरून ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करत असताना, सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास टँकर मानपाडा भागात आले. परंतु टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर मेट्रो मार्गिकेसाठी बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या पुढील भागाचा चुराडा झाला. घटनेची माहिती ठाणे वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर वाहतुक पोलीस, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर या भागात मोठ्याप्रमाणात कोंडी झाली होती.
या घटनेत टँकर मधील वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले असून कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. तसेच अपघातग्रस्त टँकरमधील प्रोपिलीन गॅस सुरक्षित आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.
काय आहे प्रोपिलीन गॅस
प्रोपिलीन गॅस हा एक महत्वाचे रसायन आहे. या गॅसचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये, प्लास्टिक, रसायने आणि इंधन उत्पादनात वापरले जाते. हा एक अत्यंत ज्वलनशील गॅस आहे. हवेच्या संपर्कात आल्यावर थोड्याशा उष्णतेनेही पेट घेऊ शकतो. योग्य वायुवीजन नसेल, तर स्फोटाचा धोका संभवतो. अधिक प्रमाणात या गॅसचा श्वास घेतल्यास डोकेदुखी, गरगरणे असा त्रास देखील नागरिकांना होऊ शकतो. द्रव स्वरूपात रसायनाचा संपर्क झाल्यास त्वचा जळू शकते किंवा डोळ्यांमध्ये त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा गॅस अपघातानंतर बाहेर आला असता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.