कल्याण– देशातील चेन्नई शहर स्वच्छ, सुंदर ठेवणारे कचरा पारुप लवकरच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत राबवून शहर स्वच्छ, सौंदर्यीकरणाला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. शहर स्वच्छ ठेवणारा आदर्शवत असा प्रकल्प चेन्नई महापालिकेतर्फे शहरात राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी चेन्नई पालिका आयुक्तांसह घनकचरा अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
तमीळनाडू राज्यातील चेन्नई महापालिकेच्या निमंत्रणावरून कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी चेन्नईच्या शहर स्वच्छ ठेवणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पांची इत्यंभूत माहिती घेतली. चेन्नई शहराच्या विविध भागांना भेटी देऊन तेथील कचरा संकलन, विल्हेवाट यंत्रणा, सयंत्रांची माहिती त्यांनी घेतली. कचरा विल्हेवाटीचे हे व्यवस्थापन पाहून त्यांनी चेन्नई पालिका देशातील कचरा विल्हेवाट लावणारी आदर्शवत महापालिका असल्याचे मत व्यक्त केले. चेन्नई महापालिका हद्दीत कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारणाऱ्या आणि राबविणाऱ्या यंत्रणा, घनकचरा अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
चेन्नई शहरातील दैनंदिन कचरा जमा करणे आणि त्याची त्याच दिवशी विल्हेवाट लावणे याकडे आमचा कटाक्ष असतो. शहर स्वच्छ ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याने आम्ही त्याच्यात तूसभर कमी पडत नाही. चेन्नई शहरातून दररोज ५४०० मेट्रीक टन कचरा जमा होतो. रात्रीच्या वेळेत बाजारपेठ, हाॅटेल्स, मंडई, रस्ते, वाणीज्य विभागातील कचरा जमा केले जातो. घराघरातून कचरा जमा करण्याची कामे दिवसाच्या नियोजना प्रमाणे पार पाडली जातात, अशी माहिती अधीक्षक अभियंत्यांनी खासदार शिंदे यांना दिली.
चेन्नईमध्ये कोन्डीगायर, पेरूनगुंडी हि दोन कचराभूमी आणि कचरा विल्हेवाट केंद्र आहेत. सात कचरा वाहतूक केंद्र आहेत. शहरातील कचरा व्यवस्थापन या केंद्रांच्या माध्यमातून हाताळले जाते. कचराभूमींची क्षमता वाढविली जात आहे. शास्त्रोक्त पध्दतीने दैनंदिन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती अभियंत्यांनी त्यांना दिली. शास्त्रोक्त पध्दतीने कचराभूमी बंद करून कचऱ्यापासून उर्जा निर्मितीचे प्रकल्प आकाराला येत आहेत. यासाठी विस्तृत प्रकल्प आराखडे तयार केले जात आहेत. सक्षम प्राधिकरणाकडे हे आराखडे मंजूर झाल्यानंतर कचऱ्यापासून वीज प्रकल्पाची प्रक्रिया सुरू होईल आणि शहर शून्य कचरा मुक्त होईल, अशी माहिती सल्लागारांनी त्यांना दिली. ही यंत्रणा येत्या काळात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत उभारून शहर स्वच्छ, आदर्शवत करण्यावर आपण भर देणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.