ठाणे : पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या भिवंडी-वाडा महामार्गावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अखेर त्रस्त झालेल्या या मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. भिवंडी येथील अंबाडी नाका या भागात हे उपोषण केले जाणार आहे. तसेच ठोस कारवाई न झाल्यास उपोषणकर्ते प्राणाची आहुती देण्यासही तयार असल्याचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे भिवंडी-वाडा मार्गाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
भिवंडी वाडा मार्ग हा पालघर आणि ठाणे जिल्ह्याला जोडतो. या मार्गालगत मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. तसेच अवजड वाहनांचा भार देखील येथे असतो. मार्गाच्या आसपास गावे आहेत. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. मागील काही वर्षांमध्ये या मार्गावर डबक्या इतके मोठे खड्डे पडले आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका तरुणाचा या मार्गावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. परंतु येथील खड्ड्यांचा प्रश्न सुटला नाही. यापूर्वीही अनेकांचा या मार्गावर अपघातामुळे बळी गेला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील रहिवाशांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. हा रस्ता बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बांधला असला, तरी देखभाल आणि दुरुस्तीच्या जबाबदारीकडे कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.
२०१९ मध्ये नागरिकांच्या आंदोलनामुळे टोल नाका बंद झाला, परंतु त्यानंतरही रस्त्याची अवस्था सुधारली नाही. याउलट, हर्षद गंधे, आंबवणे, मयूर कन्स्ट्रक्शन, जिजाऊ कन्स्ट्रक्शन यासारख्या ठेकेदारांनी कोट्यवधींची बिले काढून प्रत्यक्ष दुरुस्ती केली नाही आणि शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर येथील रहिवासी प्रमोद पवार यांनी केला.
३० सप्टेंबरपासून आमरण उपोषण
येथील रहिवाशांनी एकत्र येऊन आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. प्रमोद पवार यांच्यासोबत शेकडो तरुण या आंदोलनात उतरणार असल्याची माहिती या आंदोलनाच्या कोअर समितीचे सुनील लोणे, कल्पेश जाधव, ॲड.असगर पटेल, रूपेश जाधव, भूषण घोडविंदे,नवनाथ भोये, निलेश चव्हाण, मुकेश पाटील, सुशांत चौधरी, मुकेश पाटील ,महेश ठाकरे, सतीश जाधव यांनी दिली. प्रमोद पवार यांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांचा माल बाजारात पोहोचत नसल्याने आर्थिक नुकसान, विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणे, रुग्णांना वेळेत उपचार न मिळणे आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे.
आकाश जाधव, यश मोरे, डॉ. नेहा शेख यासारख्या अनेक तरुणांचा रस्त्याच्या खड्ड्यांमुळे मृत्यू झाला असून, अनेक जण अपंग झाले आहेत. या सर्व बाबींमुळे नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला असल्याचे सांगितले.
मागण्या काय
रस्त्याची तात्काळ दुरुस्ती, मंजूर झालेल्या नव्या रस्त्याच्या बांधकामाला तातडीने सुरुवात करावी, भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई, निधीचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, आतापर्यंतच्या दुरुस्ती आणि नव्या काँक्रिट रस्त्याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करावी, २०१९ पासून रस्त्यावर झालेला खर्च, ठेकेदारांचा तपशील, अपघातांचे आकडे आणि मंजूर निधीचा तपशील जनतेसमोर आणावा.