सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे भोवले;पुन्हा निविदा काढून नेमणुका करणार

शहर स्वच्छतेच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांकडून त्रास देणाऱ्या क्लीनअप मार्शल्सच्या विरोधात येणाऱ्या तक्रारींची दखल घेत त्यांचे काम थांबविण्याचा आदेश महापालिकेने दिले आहे.  पुढील आठवडय़ात नव्याने निविदा काढून क्लीनअप मार्शल्स नेमण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  त्यामुळे काही दिवस का होईना, क्लीनअप मार्शलच्या जाचातून सुटका झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. करार संपेपर्यंत या क्लीनअप मार्शलना बेकायदा फेरीवाले आणि होर्डिग्ज लावणाऱ्यावर कारवाई करण्याचे काम देण्यात आले आहे.

वसई, विरार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०१४ मध्ये क्लीनअप मार्शल्सची नियुक्ती केली. शहर विविध प्रकारे अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांना दंड आकारून त्यांना शिस्त लावण्याचे काम या क्लीनअप मार्शल्सकडे होते. सर्व नऊ प्रभागासाठी एकच ठेका देण्यात आला होता. एकूण १६५ क्लीनअप मार्शल्स कार्यरत होते. शहर अस्वच्छ करण्याच्या २७ प्रकारात दंड आकारणे अपेक्षित होते. आकारलेल्या दंडापैकी ४७ टक्के रक्कम पालिकेला तर ५३ टक्के रक्कम ही ठेकेदाराला मिळणार होती. या २७ प्रकारात रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, इमारतींच्या आवारात कचरा टाकणे, रस्त्यावर वाहने धुणे, पाळीव श्वानांचे मलमूत्र रस्त्यावर विसर्जित करणे, दुकानाबाहेर कचरा टाकणे आदी प्रकारांचा समावेश होता. १०० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद होती. परंतु हे क्लीनअप मार्शल्स केवळ रस्त्यात थुंकणे आणि कचरा टाकणाऱ्या नागरिकांनाच दंड आकारत होते. त्याव्यतिरिक्त इतर मार्गाने शहर अस्वच्छ करणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नव्हती.  रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या, सर्वसामान्य नागरिकांनाच त्यांनी लक्ष्य केले होते. त्यामुळे नागरिकांच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.

दरम्यान नागरिकांवर दादागिरी करून पैसे उकळणाऱ्या क्लीनअप मार्शल्सना बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईचे काम देण्यात आले आहे. परंतु  हे क्लीनअप मार्शलांनी फेरीवाल्यांनाही लुबाडण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप कॉंग्रेसचे कॅप्टन निलेश पेंढारी यांनी केला आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते बांधून घेतले असून ते न देणाऱ्या फेरीवाल्यांचे साहित्य ते जप्त करत आहेत. त्यामुळे नुकताच तुळींज पोलीस ठाण्यावर घेरावही घालण्यात आला होता. दुकानदार, फेरीवाले, इमारतीतले रहिवासी यांच्यावर कारवाई होत नव्हती. बस, रेल्वे स्थानक आदी परिसरातच ग्राहकांच्या शोध घेण्यासाठी  हे क्लीनअप मार्शल फिरत असायचे. क्लीनअप मार्शलने मागील २१ महिन्यात अडीच कोटीं रुपयांचे उत्पन्न दंडाच्या रकमेतून कमावले. परंतु अपेक्षित उद्देश साध्य झाला नाही. त्यामुळे पालिकेने क्लीनअप मार्शलची सेवा थांबवली आहे. करार पूर्ण होईपर्यंत त्यांना फेरीवाल्यांवर कारवाई तसेच अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम दिले असून नव्याने निविदा काढणार असल्याचे साहाय्यक आयुक्त सुखदेव दरवेशी यांनी सांगितले.

आता २४ तास स्वच्छता

शहर अस्वच्छता करण्याचे जे २७ प्रकार आहेत त्या सर्व प्रकारात समान दंड आकारणे गरजेचे होते. मात्र केवळ थुंकणे, कचरा रस्त्यावर टाकणे या प्रकारातच कारवाई होत असल्याने आम्ही त्यांना थांबवले आहे असे ते म्हणाले. पूर्वी क्लीनअप मार्शल सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेतच काम करायचे. नव्या निविदेत तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) २४ तास क्लीनअप मार्शल्स काम करणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी कचरा टाकणारे दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करता येणे शक्य होणार आहे असेही ते म्हणाले.

आम्ही क्लीनअप मार्शल बंद केले नसून नव्याने सुरू करणार आहोत. त्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. प्रत्येक प्रभागानुसार ठेकेदार क्लीनअप मार्शल कार्यरत राहील.

– सतीश लोखंडे, आयुक्त