९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम जाहीर

डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे आयोजित ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन संयोजक संस्थेने सोमवारी जाहीर केले. ३, ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी हे संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती संमेलनात असणार आहे.

याशिवाय, विविध परिसंवादामधून ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, साहित्यिका मीना गोखले, कवयित्री प्रा. नीरजा, डॉ. नरेशचंद्र, अमृता सुभाष, समाजसेविका मेधा पाटकर, ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर, डॉ. अनिकेत आमटे, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी, अभिनेते सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी यांसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत तीन दिवसीय कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. या वेळी महामंडळाचे विश्वस्त राजन लाखे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शंकरकाका भोईर, जगन्नाथ पाटील, आबासाहेब पटवारी उपस्थित होते.

पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलात हे संमेलन होत आहे. संमेलन स्थळाला भाषाप्रभू पु. भा. भावे साहित्य नगरी नाव देण्यात आले आहे. पाच मुख्य सभा मंडपांना सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, साहित्यिक दिवंगत शं. ना. नवरे, भवरलाल जैन, मंगेश पाडगावकर यांची नावे देण्यात आली आहेत.

बालकुमार मेळावा, शोध युवा प्रतिभेचा, ग्रामीण स्त्री वास्तव, साहित्य व्यवहार आणि माध्यमांची जबाबदारी, बदलती अर्थव्यवस्था, युद्धस्य कथा, काव्यानुभव, कविसंमेलन, पुरोगामी महाराष्ट्र व वाढती असहिष्णुता, नवे लेखक-नवे कवी, गझल-बोली भाषेतील काव्यवाचन, आम्ही मराठीचे मारेकरी, विविध साहित्य प्रवाहांची सद्य:स्थिती असे भरगच्च कार्यक्रम तीन दिवसांत आयोजित करण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता, नोटाबंदीचा फटका संमेलनाला संयोजनाला बसला असून सव्वापाच कोटींऐवजी आतापर्यंत दीड कोटींचा निधी जमा झाला आहे. काही निधी विविध माध्यमांतून जमा केला जात आहे.

  • खर्चात कपात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वागत समिती सदस्यत्वासाठी ३५६ सदस्य नोंदणी, संमेलन प्रतिनिधीसाठी १९० सदस्य नोंदणी आणि ३५० ग्रंथ विक्रीसाठी स्टॉल नोंदणीकृत झाले आहेत, अशी माहिती गुलाब वझे यांनी दिली.