ठाणे : स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य वर्गातील ज्या तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो त्यांना राष्ट्रीयीकृत बँक कर्ज देण्यास तयार होत नाहीत. उलटपक्षी ज्या मुलांच्या वडिलांच्या खात्यात करोडो रुपये असतात त्यांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देतात. त्यामुळे सहकारी बँकांनी स्वत:चा व्यवसाय करू पाहणाऱ्या तरुण पिढीला कर्ज देण्याबरोबरच त्यांच्या पाठी ताकदीनं उभं राहणं गरजेच आहे. असे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

जीपी पारसिक सहकारी बँकेला पन्नास वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने बँक व्यवस्थापनातर्फे ठाण्यातील गडकरी नाटय़गृहात शनिवारी सुवर्ण महोत्सवी सोहळय़ाचे आणि बँकेच्या स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या स्वत:चा व्यवसाय सुरू करणारी एक तरुण पिढी जन्माला येत आहे. विद्या ही आता कोणत्याही एका जात समूहाची राहिलेली नाही. त्यामुळे बहुजन समाजातील अनेक तरुण सध्या उच्चशिक्षण घेत आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक साहाय्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका या तरुणांना विचारतदेखील नाही. मात्र ज्या तरुणांच्या वडिलांच्या खात्यात करोडो रुपये आहेत अशा तरुणांना या बँका व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देतात. त्यामुळे सहकारी बँकांनी वेळ पडल्यास जोखीम घेऊन या तरुणांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. कारण या तरुणांना सहकार चळवळीचा मोठा आधार आहे, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकार चळवळीचा एका मोठा वाटा आहे.

मदत करू- कपिल पाटील

स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी ज्या तरुणांच्या खात्यात पैसे नसतील, मात्र ते कर्ज घेण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करत असतील तर त्यांना कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज मिळवून देण्यास माझ्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेल्या स्टार्ट अप इंडियाच्या मुद्दयांवर भाष्य करताना कपिल पाटील यांनी हे वक्तव्य केले.