ठाणे : भिवंडी महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे योग्य प्रकारे व्हावीत तसेच या कामात कोणतीही कसूर राहू नये यासाठी या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रभाग समितीनिहाय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्याचा निर्णय आयुक्त अनमोल सागर यांनी घेतला आहे. तसेच नालेसफाईची अचानकपणे पाहाणी करणार असून त्यात कामामध्ये दिरंगाई किंवा जाणीवपुर्वक हलगर्जी आढळून आल्यास ठेकेदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त सागर यांनी दिला आहे.

पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन भिवंडी महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईची कामे करण्यात येतात. यंदाही महापालिकेने अशाचप्रकारे शहरात नालेसफाईची कामे हाती घेतली आहे. परंतु या कामानंतरही काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरून घरातील साहित्यांचे नुकसान होते. यामुळे महापालिका प्रशासनावर टिका होती. या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे योग्य प्रकारे व्हावीत तसेच या कामात कोणतीही कसूर राहू नये यासाठी या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रभाग समितीनिहाय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्याचा निर्णय आयुक्त अनमोल सागर यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार प्रभाग समितीनिहाय अधिकाऱ्यांची नेमणुकही करण्यात आली आहे.

ठेकेदारांच्या नाले सफाईच्या कामावर मुख्यालय स्तरावरुन नियंत्रण आणि दैनंदिन देखरेख करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सहायक आयुक्त, उपायुक्त, अतिरीक्त आयुक्त आणि स्वत: आयुक्त हे काम सुरू असताना कोणत्याही वेळी अचानक भेट देऊन कामाची पहाणी करणार आहेत. त्यावेळी कामामध्ये दिरंगाई अथवा जाणीवपुर्वक हलगर्जी आढळल्यास त्याचक्षणी नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ठेकेदाराने त्यास ठरवुन दिलेल्या दैनंदिन उद्दिष्टाप्रमाणे काम करणे बंधनकारक असेल. जर दैनंदिन उदिष्ट पुर्ण झाले नाही, तर त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सफाई कामाच्या वेळेस ठेकेदाराने सर्व कामगारांना सर्व सुरक्षा विषयक साधने पुरविणे आणि कामगारांनी ती वापरणे बंधनकारक असणार आहे. तसेच काम करताना कोणतीही दुर्घटना किंववा अपघात घडल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नाले सफाईच्या दैनंदिन कामाचे जिओ टॅग फोटो सादर करणे ठेकेदारास बंधनकारक करण्यात आले असून विहित वेळेत काम केले नाहीतर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात एकूण पाच प्रभाग समित्या आहेत. या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात बंदिस्त आणि उघड्या स्वरुपाचे लहान, मोठे असे एकूण १३५ नाले आहेत. या नाल्यांमधील गाळ आणि कचरा काढण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यासाठी पालिकेने निविदा प्रक्रीया राबवून ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये उल्हासनगर येथील मे. राहुल इंटरप्रायजेस, भिवंडी येथील मे. सुशिल एल. गायकवाड, मे. बुबेरे ॲण्ड असोसिएट, उल्हासनगर येथील मे. साई कन्स्ट्रक्शन, भिवंडी येथील मे. चंडिका कन्स्ट्रक्शन, मुख्य रस्त्यासह गटर सफाईसाठी भिवंडीतील मे. सुशिल एल. गायकवाड या ठेकेदारांचा समावेश आहे.