उल्हासनगरः घरातील एखादा कार्यक्रम असल्यास सभागृहांची शोधाशोध करावी लागते. त्यात पालिकेच्या सभागृहांची नोंदणी करावी लागते. मात्र या नोंदणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, पालिका अधिकाऱ्यांकडे धावाधाव करावी लागते. आता उल्हासनगरातील नागरिकांची ही धावाधाव बंद होणार आहे. एखाद्या हॉटेलप्रमाणे उल्हासनगर शहरातील समाज मंदिर, सभागृह, उद्याने, शाळांची सभागृह आणि पालिकेच्या मालमत्ता नोंदणी करता येणार आहेत. या डिजीटल निर्णयाबद्दल उल्हासनगर महापालिका प्रशासनाचे कौतुक केले जाते आहे.

उल्हासनगर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसात कार्यालयीन प्रणाणी अद्ययावत करण्याकडे लक्ष दिले आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे पालिका मुख्यालयात येणारे अभ्यांगत, पालिकेतील दालनांचे फलक, ई कार्यालय प्रणालीचा अवलंब असे निर्णयही पालिका प्रशासनाने घेतले होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या अभियानात उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी राज्यात अव्वल स्थान मिळवले होते.

यानंतर आता उल्हासनगर महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी एक अनोखे पाऊल उचलले आहे. शहरातील सुमारे १४१ समाद मंदिरे, २० शाळा सभागृह, ४ भाजी मंडई, ६१ उद्याने आणि तीन पालिकेच्या मालमत्ता भाडेतत्तावर देण्यात येतात. याच्या नोंदणीसाठी आधी नागरिकांना पालिका कार्यालय, प्रभाग समित कार्यालयात धाव घ्यावी लागत होती. चांगली तारीख, चांगली वेळ निवडण्यासाठी राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे विशेष ओळख काढावी लागत होती. त्यामुळे ज्याचा संपर्क त्याला चांगला दिवस आणि वेळ सहज मिळत होता. मात्र उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आता ही संपूर्ण यंत्रणाच ऑनलाईन केली आहे. नुकताच या उपक्रमाचा शुभारंभ उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात करण्यात आला.

यापुढे http://www.umcestate.com या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून नागरिक आता स्वतःच्या सोयीने घरबसल्या समाज मंदिर, उद्यान, शाळा, भाजी मंडई आणि पालिकेच्या मालमत्तेतील सभागृहांची बुकिंग करू शकतील. त्यामुळे ही प्रक्रिया आता पूर्णतः पारदर्शन झाली आहे.

कशी करणार नोंदणी

http://www.umcestate.com या संकेतस्थळावर जाऊन नागरिकांनी स्वतःची नोंदणी करून सभागृह नोंदणी करायची आहे. यात मैदान, भाजी मंडई, उद्यान, शाळा, समाज मंदिर आणि पालिका मालमत्ता असे पर्याय आहेत. यात कार्यक्रमाचा दिवस, हेतू, वेळ, सुरक्षा अनामत रक्कम आणि नोंदणी शुल्क भरून आधार क्रमांक आणि कार्यक्रम पत्रिका जोडून नोंदणी करता येईल.