Escalators Kalyan Railway Station – मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर शहाड दिशेने सरकता जिना उभारण्याची कामे रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहेत. या सरकत्या जिन्यामुळे फलाट क्रमांक तीन आणि चारवरील शहाड बाजूकडील पाच रेल्वे डब्यांमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. हे काम रेल्वे प्रशासनाने लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर शहाड बाजूकडील प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट ते स्कायवाॅक दरम्यान उत्तर आणि दक्षिण दिशेने प्रवाशांच्या सोयीसाठी यापूर्वी दोन्ही बाजूने जिन्यांची सुविधा होती. जुन्या रचनेतील ही जिन्यांची सुविधा त्याच जागांवर नवीन जिने बांधताना रेल्वेने फक्त दक्षिण बाजूकडील जिना बांधला. पूर्वीच्या रचनेतील या जिन्याच्या उलट बाजूला असलेला उत्तरेकडील जिना नवीन रचनेत काढून टाकण्यात आला. या रचनेमुळे कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर उतरणाऱ्या शहाड बाजूकडील पाच डब्यांमधील प्रवाशांना गर्दीतून वाट काढत, दोन ते तीन मिनिटे फलाटावरून चालत दक्षिण बाजूकडील जिन्याकडे जाऊन मग स्कायवाॅकवर जावे लागत होते. उत्तर बाजूकडील जिना काढून टाकल्याने मागील दोन वर्षांपासून प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. फलाट क्रमांक तीन आणि चारवर मुंबईला जाणारी आणि कल्याणकडे जाणाऱ्या लोकल एकाच वेळी आल्या की शहाड दिशेने कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर उतरणाऱ्या प्रवाशांना चेंगराचेंगरी करत दक्षिण दिशेकडील जिन्याकडे घुसमटत जावे लागत होते. सकाळ, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही चेंगराचेंगरी अधिक होत आहे. यामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे.
प्रवाशांची होणारी ही गैरसोय विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक तीन आणि चारवरील शहाड बाजूकडील उत्तर दिशेकडील जिन्याच्या जागेवर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकता जिना उभारणीचे काम प्रस्तावित केले आहे. या सरकत्या जिन्यामुळे फलाटावर शहाड दिशेने स्कायवाॅकवर चढण्यासाठी होणारी गर्दी, चेंगराचेंगरी कमी होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे. दसरा, दिवाळी या सणांपूर्वी सरकत्या जिन्यांचे काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.