ठाणे : मध्य रेल्वे मार्गाने आणि रस्ते मार्गाने ठाणे मुंबई ही शहरे जोडली असली तरी आता मेट्रोने ही शहरे जोडण्याचे कार्य सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार प्रकल्पाची निर्मिती होत असून एक महत्त्वाचा टप्पा यामध्ये गाठला गेला आहे. मुंबई मेट्रो चार मार्गिकेसाठी अवघ्या एका रात्रीत ५६ मीटर लांबीचा, ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन बसविण्यात आला. या दरम्यान नऊ उच्च क्षमतेच्या क्रेन, दोन मल्टी-ॲक्सल पुलर्स इतकी यंत्रणा वापरण्यात आली असून १०० हून अधिक कुशल कामगारांनी यासाठी मेहनत घेतली.
ठाणेकरांचा मुंबईतील प्रवास सुकर व्हावा यासाठी मेट्रो चार मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मेट्रो चार प्रकल्पासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी घोडबंदर भागात मेट्रो चार मार्गिकेसाठी चाचणी देखील घेण्यात आली. असे असले तरी हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. मेट्रो चार मार्गिका ही ठाण्यातील घोडबंदर येथील कासारवडवली येथून सुरु होते. त्यानंतर ती पूर्व द्रुतगती महामार्गाने तीन हात नाका, एलबीएस रोड मार्गे मुलुंड भांडूप येथून पुढे घाटकोपर अशी वाहतुक करेल. या कामाचा एक भाग म्हणून एक महत्त्वाचे कार्य पूर्ण झाले आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यास मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा मोठा ताण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच रस्ते वाहतुकीवरील कोंडीची समस्या देखील घटणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगितले जाते.
भांडूप ते सोनापूर मोहीम
नुकतेच एका रात्रीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडूप–सोनापूर (जेएमएलआर) जंक्शनवर ५६ मीटर लांबीचा आणि तब्बल ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन यशस्वीरित्या बसवला. वडाळा ते कासारवडवली या मुंबई मेट्रो लाईन चारच्या कामाला आता ८४.५ टक्के प्रगती मिळाली आहे.
भर पावसात कठीण काम
अवकाळी पावसाच्या कठीण परिस्थितीतही दोन गर्डर असलेल्या स्टील स्पॅनचे काम अचूकपणे पूर्ण करण्यात आले. या दरम्यान नऊ उच्च क्षमतेच्या क्रेन, दोन मल्टी-ॲक्सल पुलर्स आणि १०० हून अधिक कुशल कामगारांनी मेहनत घेतली. हे काम पूर्ण करण्यास वाहतूक पोलीस विभाग, मुंबई महापालिका आणि एमएसईडीसीएलने देखील महत्त्वाची भूमिका बजावली.
