कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील विजय तरुण मंडळाने शिवसेनेतील बंडखोरीच्या विषयावर सादर केलेल्या चलतचित्र देखाव्याला आक्षेपार्ह ध्वनीमुद्रण आणि वाद्ग्रस्त देखावा काढून टाकण्याच्या अटीवर उच्च न्यायालयाने गणेशोत्सव साजरा करण्यास शुक्रवारी परवानगी दिली. पोलिसांनी तातडीने या गणेशोत्सव मंडळाला अत्यावश्यक परवानग्या देऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा केला.
विजय तरुण मंडळाने शिवसेनेतील बंडखोरीवर वादग्रस्त चलतचित्र देखावा उभा केला होता. या चलतचित्र देखाव्यात ‘मी शिवसेना बोलते’ असे शीर्षक देऊन शिवसेनारुपी वटवृक्षाच्या माध्यमातून शिवसेना आपला राजकीय वाटचालीचा प्रवास ध्वनीमुद्रणातून कथन करते. हे करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय प्रदुषणावर या चलतचित्रात ‘गद्दारांना धडा शिकविण्याची ताकद दे, बुध्दी दे’ असे वक्तव्य करण्यात आले होते. शासन प्रमुखाला या देखाव्यात लक्ष्य करण्यात आल्याने शासन पातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली.
दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना विजय तरुण मंडळाचा आक्षेपार्ह पध्दतीने उभारलेला देखावा काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या सूचनेवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या दिवशी पहाटे मंडळाचा देखावा जप्त केला. मंडळ पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली.
पोलिसांनी अचानक कारवाई केल्याने शिवसैनिकांसह विजय तरुण मंडळाचे संस्थापक तथा महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शासन, पोलीस कारवाईच्या निषेधार्थ गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मंडपा समोर शासनाच्या निषेधार्थ महाआरती करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईला मंडळाने उच्च न्यायालयात बुधवारीच आव्हान दिले. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य ओळखून तातडीने ही याचिका सुनावणीला घेतली. मंडळाने या चलतचित्र देखाव्यातील आक्षेपार्ह दृश्य, ध्वनीमुद्रण काढून टाकण्याची तयारी स्वताहून न्यायालयासमोर दाखविली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या मंडळाला अटीशर्तींच्या अधीन राहून उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनमाने यांनी सांगितले.