डोंबिवली येथील पूर्व भागातील सारस्वत बँकेत पाचशे रूपयांच्या ४५ बनावट नोटा भरणाऱ्या ग्राहकाविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ग्राहक हे कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील रहिवासी आहेत.

सारस्वत बँकेच्या व्यवस्थापक विनिता बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या मंगळवारी फळेगाव येथील एक बँक ग्राहक सारस्वत बँकेत एटीएमच्या माध्यमातून पैसे भरण्यासाठी आले होते. त्यांच्याजवळ ५०० रूपयांच्या ९० नोटा असे एकूण ४५ हजार रुपये होते. त्याने ही रक्कम एटीएममध्ये भरणा केली. एटीएम यंत्राने या नोटांची अंतर्गत छाननी करताना खऱ्या ४५ नोटा बाहेर ढकलल्या. या नोटा ग्राहकाने ताब्यात घेतल्या. उर्वरित ४५ नोटा बनावट असल्याने त्या एटीएम यंत्रातून बाहेर आल्या नाहीत. एटीएममध्ये नोटा अडकल्याने ही माहिती ग्राहकाने बँके बाहेरील सुरक्षा रक्षकाला दिली. सुरक्षा रक्षकाने ही माहिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली.

हेही वाचा >>>ठाण्यात निधीअभावी शंभरहून अधिक सीसीटिव्ही कॅमेरे बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँक अधिकाऱ्यांनी एटीएम यंत्रात अडकलेल्या ४५ नोटा बाहेर काढल्या. त्यांची तपासणी केली असता त्या नोटांचा कागद व्यवहारातील नोटेच्या कागदापेक्षा जाड होता. या नोटेवरील सुरक्षेच्या खुणांमध्ये तफावत बँक अधिकाऱ्यांना आढळली. या बनावट नोटांबद्दल अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहकाला या नोटा कोठुन आणल्या याची विचारपूस केली. त्यांनी या नोटा आपणास व्यवहारातून मिळाल्या आहेत असे सांगितले. बनावट नोटा २२ हजार ५०० रूपयांच्या होत्या. आपण बँकेत भरत असलेल्या नोटा बनावट आहेत हे माहित असुनही स्वत:च्या फायद्याकरिता ग्राहकाने या नोटा बँकेत भरणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून बँक अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहका विरुध्द तक्रार केली आहे. रामनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.