कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळ एका नागरिकाला एका भामट्याने संमोहित करुन भुरळ घालून त्यांच्या जवळील बँकेचे एटीएम कार्ड काढून घेतले. या कार्डाचा बेकायदा वापर करुन त्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकाच्या बँक खात्यामधून विविध ठिकाणच्या एटीएम केंद्रातून २७ हजार ५३६ रुपये काढून घेतले. गेल्या पंधरा दिवसापूर्वी हा प्रकार घडला आहे.
घरी गेल्यानंतर या नागरिकाला आपणास कोणीतरी फसविले असल्याचे जाणवले. त्यांनी पाकिटातील एटीएम कार्ड पाहिले तर ते त्यांना दिसले नाही. आपली कोणी तरी भुरळ घालून फसवणूक केली म्हणून नागरिकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : उल्हासनगर : गणेशोत्सवात जुगार जोमात ; दोन दिवसात 39 जणांवर गुन्हे
वसंत पांडुरंग आगीवले (४४, रा. मंगला प्रस्थ सोसायटी, पुण्योदन पार्क समोर, कल्याण पश्चिम) अशी फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. ते नोकरदार आहेत. पोलिसांनी सांगितले, वसंत आगीवले यांनी गेल्या पंधरा दिवसापूर्वी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानका जवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून १० हजार रुपयांची रक्कम काढली. ते एटीएम मधून बाहेर आल्यानंतर त्यांना एका इसमाने बोलण्यात गुंतवून त्यांना संमोहित करुन भुरळ घातली. या कालावधीत भामट्याने वसंत यांच्या जवळील सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड काढून घेतले. भुरळ घातल्याने काय घडतय हे वसंत यांना कळले नाही. भामट्याने स्वता जवळील स्टेट बँकेचे प्रवीण घोडके या नावाने असलेले एटीएम कार्ड वसंत आगीवले यांना दिले. प्रवीण यांचा गुप्त संकेतांक भामट्याला माहिती नसल्याने तो त्या कार्डचा वापर करू शकत नव्हता.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात १८ हजार १२६ गौरींचे आगमन
वसंत आगीवले यांच्याकडून एटीएम कार्ड काढून घेतल्यानंतर भामट्याने त्यांच्या जवळून पळ काढला. तोपर्यंत वसंत आगीवले रिक्षेत बसून घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांना आपल्या जवळील एटीएम कार्ड गायब असल्याचे दिसले. या कालावधीत भामट्याने वसंत यांच्या बँक खात्यामधून दोन ते तीन व्यवहार करुन २७ हजार रुपयांची रक्कम काढली.
एटीएम केंद्रा बाहेर भेटलेल्या भामट्यानेच हा व्यवहार केला असल्याची जाणीव त्यांना झाली. आपल्याला बोलण्यात गुंतवणूक भामट्याने आपली फसवणूक केल्याने बँकेने केलेल्या सूचनेवरुन वसंत आगीवले यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी असे प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानक भागात घडले होते. तेच हे भामटे असण्याचा संशय पोलिसांना आहे.