लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे- मुंब्रा येथील कौसा भागातील मुघल पार्क इमारतीमधील भंगाराच्या दुकनात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीनजण जखमी झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. या स्फोटामुळे १ घराचे, १२ दुकानांचे आणि दोन वाहनांसह आसपासच्या इमारतीमधील घरांच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक हादरले. स्फोटामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीला तडे गेल्याने हि इमारत धोकादायक झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने येथील ७६ रहिवाशांना परिसरातील शाळेत स्थलांतरीत केले आहे.

मुंब्रा येथील कौसा भागातील चांदनगर परिसरात मुघल पार्क ही चार मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये २८ घरे आणि तळमजल्यावर सात दुकाने आहेत. त्यातील तीन क्रमांकाच्या गा‌ळ्यात भंगाराचे दुकान होते. या गाळ्यात ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा शनिवारी सका‌ळी स्फोट झाला. या घटनेत अजहर शेख, अर्षू सय्यद (१०) आणि जिनत मुलानी (५०) हे जखमी झाले आहेत. चौथ्या मजल्यावर राहत असलेले अजहर शेख यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दुसऱ्या मजल्यावर राहत असलेल्या अर्षू सय्यद याच्या हाताला आणि जिनत मुलानी यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अजहर शेख आणि अर्षू सय्यद यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, जिनत यांच्यावर १०८ रुग्णवाहिकेमध्ये प्रथमोपचार करण्यात आले.

आणखी वाचा-नव मतदार नोंदणीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने लढवली शक्कल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी- कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, टोरंट पॅावर कंपनीचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक हादरले. या घटनेत इमारतीच्या तळ मजल्यावरील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासह, एका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका रिक्षाची काच तुटण्याबरोबरच छतही फाटले आहे. शिवाय, समोरील फरिदा बाद या इमारतीच्या काही घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. मुघल पार्क या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीला तडे गेल्याने हि इमारत धोकादायक झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाने ही इमारत रिकामी केली आहे. या इमारतीमधील २८ घरांमध्ये ७६ नागरिक राहत असून त्यांना कौसा येथील शिमला पार्क शाळेत तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे.