डोंबिवली : कोपर रेल्वे स्थानकातून प्रवाशांनी जिन्यांनी प्रवास करावा म्हणून रेल्वे प्रशासनाने आवश्यक सुविधा, जिने, स्कायवाॅक उपलब्ध करून दिले आहेत. तरीही अनेक पालक आपल्या लहान मुलांना घेऊन कोपर पूर्व, पश्चिम भागातून शाळेत, घरी जाण्यासाठी रेल्वे मार्गाचा वापर करत आहेत.

कोपर रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या सुरक्षा बळाच्या जवानांंनी, सुरक्षा कमांडोजनी अशा पालकांना रोखून त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. अनेक पालक कोपर रेल्वे स्थानकात लोकल येत नाही हे पाहून आपल्या लहान बाळे, नातवांसह रेल्वे मार्गात उतरतात. आणि तेथून रेल्वे मार्गातून फलाटाच्या दिशेने पायी चालत जातात. प्रवाशांनी फलाटावरून थेट रेल्वे मार्गात उतरून प्रवास करू नये म्हणून कोपर रेल्वे स्थानकात फलाटांच्या कोपऱ्यांवर लोखंडी जाळ्या रेल्वेने लावल्या आहेत. तरीही त्या लोखंडी जाळ्यांच्या आडोशाने मोकळ्या जागेतून प्रवासी थेट रेल्वे स्थानकात जातात. अनेक लहान मुले रेल्वे मार्गातून जाण्याची सवय झाल्याने या जाळ्यांच्या भागातून फलाटावर सराईतपणे चढतात.

कोपर पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक मुले या भागातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. जिन्यावरून कोपर पूर्व, पश्चिम भागाचा प्रवास करताना वळसा घ्यावा लागतो. अनेक पालक मधला मार्ग म्हणून फलाटावार तिकीट तपासणीस, रेल्वे व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा बळाचा जवान नाही म्हणून थेट फलाटावर येतात. तेथून ते फलाटावरून उडी मारून रेल्वे मार्गात उतरतात. त्या पाठोपाठ लहान मुले फलाटावरून उड्या मारून रेल्वे मार्गातून चालण्यास सुरूवात करतात. काही बालकांना आपले पालक फलाटावरून खांद्यावर घेऊन उतरतात. या कसरती करताना अचानक लोकल आली तर या पालकांना आपल्या मुलांसह वाचण्यासाठी जागा नाही.

सकाळ, संध्याकाळ शाळा सुटल्या की कोपर रेल्वे स्थानकात हा प्रकार पाहण्यास मिळतो, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. कोपर रेल्वे स्थानकात अनेक वेळा गस्तीवर कमांडोज, रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असतात, पण ते रेल्वे स्थानकाच्या दिवा बाजुला बाकड्यावर बसून मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे चित्र अनेक वेळा दिसते. त्यामुळे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घ्यावी. पालक सातत्याने रेल्वे मार्गातून लहान मुलांना घेऊन प्रवास करत असतील तर त्यांच्यावर प्रसंगी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.