कल्याण : मागील काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली परिसरात भुरट्या चोऱ्या, रात्रीच्या वेळेत सार्वजनिक ठिकाणचे मद्य, अंमली पदार्थ सेवनाचे अड्डे सुरू झाले होते. रेल्वे स्थानक परिसरात छुपे गैरधंद्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यावर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत २४० पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी कल्याण, डोंबिवली शहर परिसरात अचानक धरपकड, छापा मोहीम राबवून ३५० हून अधिक समाजकंटक, गुंडांवर कारवाई केली.
गेल्या वर्षी अशाप्रकारची धरपकड मोहीम सलग दोन ते तीन महिने राबवून कल्याण, डोंबिवली शहरातील रात्री, दिवसा चालणारे विविध प्रकारचे अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले होते. सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन, अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात फेऱ्या मारण्यास भाग पाडले होते. कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त करण्याच्या मोहिमाचा हाही एक भाग होता. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या या मोहिमेमुळे शहरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक समाधान व्यक्त करत होते. आता शहरात पुन्हा रात्रीच्या वेळेत गैरधंदे, सार्वजनिक ठिकाणचे अड्डे सुरू झाले असल्याची चाहूल लागल्याने उपायुक्त झेंडे यांनी कल्याण, डोंबिवलीतील आठही पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकरी यांना शनिवारी अचानक संदेश देऊन शनिवारी रात्री धरपकड आणि छापा मोहीम राबविण्याचे आदेश दिले. या मोहिमेत उपायुक्त झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे स्वता सहभागी झाले होते.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील इमारती, रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांच्या आडोशाने लपलेले भुरटे चोरे, मद्यपी यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. शहराच्या विविध भागात झाडाझुडपांचा आधार घेऊन मद्य सेवन, अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी बसलेल्या समाजकंटकांच्या झुंडी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. काहींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना पोलिसांनी चारही बाजुने घेरून रात्रीत त्यांची शहरात धिंड काढली. मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांकडून ४५ हजार रूपयांचा दंड वसूल केला. सहा खतरनाक गुंड पकडण्यात आले. २७ तडिपार गुंडाची तपासणी केली.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री आठ ते पहाटे चार वाजेपर्यंत कल्याण, डोंबिवली शहर परिसरात अचानक धरपकड, छापा मोहीम राबवून ३५० हून अधिक समाजकंटक, गुंडांवर कारवाई केली.https://t.co/2jrmCKvB4K#police #crime pic.twitter.com/RxIoz6z96p
— LoksattaLive (@LoksattaLive) October 26, 2025
डोंबिवली, कल्याण परिसरात अचानक पोलिसांकडून धरपकड आणि छापा मोहीम सुरू झाल्याने मोकळ्या मैदानांमध्ये श्रमपरिहाराचे सामान मांडून ऐसपेैस बसलेल्या टोळक्यांची पोलिसांनी धरपकड केली. पकडण्यात आलेल्या मद्यपींमध्ये सुस्थितीत घरातील काही नागरिक असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या सर्वांना पकडून त्यांची परिसरात वरात काढण्यात आली. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
रात्री आठपासून सुरू झालेली ही धरपकड मोहीम पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होती. ही मोहीम यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. ३५० हून अधिक गुंड, समाजकंटक, मद्यपी, गर्दुल्ले, गैरधंदे करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून न्यायालयामार्फत कारवाई केली जाणार आहे.
कल्याण, डोंबिवली शहर परिसरात शनिवारी रात्री ते पहाटेपर्यंत धरपकड आणि छापा मोहीम राबवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, शांततेचा भंग करणारे, परिसरात गैरधंदे करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. अतुल झेंडे पोलीस उपायुक्त, कल्याण.
