ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गाव हद्दीतील काही भूभागातून मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वेची आखणीचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वे मार्गिका आणि त्याच्या लगतचा काही भाग प्रभावित होणार आहे. या बाधित भूभागाचा मंजूर विकास आराखड्यात उल्लेख व्हावा म्हणून शासन आदेशा वरुन २७ गावच्या मंजूर विकास आराखड्यात उक्त रेल्वे मार्गिका असा प्रस्ताव गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवली पालिकेने मंजूर केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण : वाहतूक पोलिसाला ठोकर देणाऱ्या दुचाकी स्वाराला दोन वर्षाचा कारावास

या फेरबदलाचा नकाशा पालिका मुख्यालयातील साहाय्यक संचालक नगररचना आणि ई प्रभाग कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी २७ गाव भागातील नागरिकांना एका जाहीर आवाहनाव्दारे कळविली आहे.
या प्रस्तावित फेरबदलास ज्या नागरिकांना हरकती, सूचना घ्यायच्या आहेत. त्यांनी आपल्या हरकती सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागात दाखल कराव्यात. या हरकती, सूचनांमुळे फेरबदलाचा प्रस्ताव शासन मंजुरीस सादर करण्यापूर्वी त्याचा विचार करणे शक्य होणार आहे, असे आयुक्त डॉ. दांगडे यांनी जाहीर आवाहनात म्हटले आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गाव क्षेत्रासाठीची मंजूर विकास योजना शासनाच्या नगरविकास विभागाने मार्च २०१५ मध्ये मंजूर केली आहे. या विकास योजनेतील फेरबदलास नगरविकास विभागाने मे २०१७ मध्ये मंजुरी दिली आहे.

हेही वाचा >>>बदलापुरात गणेशोत्सवापूर्वी पाण्याचा ठणठणाट ; अनेक भागात पाणी नाही, बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबईतील बीकेसी येथून आखणी करण्यात आलेली अहमदाबाद जलदगती रेल्वे सेवा मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या २१ किमी भागातून जात आहे. ठाणे, शिळफाटा, म्हातार्डेश्वर, कोपर असे वळण घेऊन ही रेल्वे अहमदाबाद दिशेने जाणार आहे. केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात या रेल्वेच्या कामाला राज्य सरकारकडून सहकार्य न मिळाल्याने हे काम ठप्प होते. ठाणे पालिकेने भूसंपादनासा विरोध केला होता. आता राज्यातील सरकार बदलताच या रेल्वे मार्गाला पुन्हा गती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामासाठीच्या अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. विहित वेळेत हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी शासन यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रेल्वे मार्गासाठीची जमीन आणि त्याच्या लगतचे प्रभावित क्षेत्र हे उक्त रेल्वे मार्गिका म्हणून यापुढे विकास योजनेत नोंदले जाणार आहे. शिळफाटा, कोपर हा परिसर २७ गाव भागाला खेटून असल्याने प्रभावित क्षेत्र म्हणून २७ गावांच्या विकास योजनेत उक्त रेल्वे मार्गिका म्हणून शासन आदेशाप्रमाणे नोंद होणार आहे. या विहित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने २७ गाव हद्दीतील योजनेत उक्त रेल्वे मार्गिका म्हणून प्रशासकीय प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीवर २७ गाव नागरिकांच्या काही हरकती, सूचना असतील त्या दाखल करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.