ठाणे – जमिनीची मोजणीकरून त्याची हद्द निश्चित करण्याचे काम प्रशासनातील भूकरमापकांच्या माध्यमातून केले जाते. मात्र अनेकदा या भूकरमापकांकडून जागा सापडत नसल्याचे कारण देणे, मोजणीसाठी जागेवर उशिरा पोहचणे यांसारख्या गोष्टी केल्या जात असे. यामुळे अनेकदा भूधारक आणि भूकरमापकांमध्ये वादाचे प्रसंग उदभवल्याचे ही उघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आता भूकरमापकांना मोजणी वेळी जाताना संबंधित भूधारकाला आणि स्थानिक कार्यालयाला थेट स्थान ( लाईव्ह लोकेशन ) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भूकरमापकांच्या कामावर कामावर नियंत्रण ठेवणे सोपे जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जमिनेची मोजणी करून त्यांची हद्द निश्चित करण्याचे काम अत्यंत महत्वाचे असते. यामुळे शेतकऱ्यांना तसेच इतर भूधारकांना जमिनीचे व्यवहार करते वेळी अथवा नुकसान भरपाईसाठी अर्ज करतेवेळी जमिनीची योग्य माहिती असणे महत्वाचे असते. यासाठी सर्व शेतकऱ्यांकडून जमिनीची शासनाच्या माध्यमातून मोजणी करून सातबाऱ्यावर त्याची नोंद करून घेतली जाते.

सध्या जमीन मोजणीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध असून, अर्ज केल्यानंतर मोजणीची आगाऊ नोटीस दिली जाते. मात्र, अनेकदा भूकरमापक जागेवर उशिरा पोहोचतात किंवा अर्जदारांना त्यांचा थेट संपर्क होत नाही, त्यामुळे गैरसमज व अडचणी निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आता भूकरमापक मोजणीच्या दिवशी मोजणीस्थळी जाण्यापूर्वी आपले थेट स्थान संबंधित अर्जदार, लगतधारक आणि कार्यालयप्रमुख यांना व्हॉट्सॲपवर पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे मोजणी अर्जदार व स्थानिकांना भूकरमापक किती अंतरावर आहेत, ते कधी पोहोचतील याबाबत तात्काळ माहिती मिळेल. कार्यालयप्रमुखांना देखील कर्मचारी मोजणीस्थळी पोहोचले आहेत की नाही, याचे थेट माहिती मिळेल. यामुळे मोजणी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढून अर्जदारांचा विश्वास बळकट होईल आणि वेळेची बचत होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा प्रशासनाने भूमी अभिलेख विभागामार्फत ई-मोजणी, इप्सित पोर्टलवरील ऑनलाईन फेरफार सुविधा, ‘प्रत्यय’ प्रणालीद्वारे ऑनलाईन अपील अर्ज दाखल करण्याची सुविधाही सुरू केली आहे. या सर्व सुविधा “महाभूमी” पोर्टलवर उपलब्ध आहेत. नागरिकांनी या तंत्रस्नेही सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांनी केले आहे.