डोंबिवली : जीवाची पर्वा न करता भारत देशाच्या सीमेवर अति दुर्गम भागात आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी लोकसहभागातून दहा हजार दिवाळी फराळाचे डबे पाठविण्यात येणार आहेत. भारत विकास परिषद आणि शहीद कॅप्टन विनयकुमार सचान, डोंबिवली शाखांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
सीमावर्ती भागातील जवानांसाठी दिवाळी फराळ दिवाळीच्या दिवशी मिळावा या विचारातून आतापासून दिवाळी फराळाचे डबे भरून ते बंदिस्त करण्याच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. दिवाळी फराळा बरोबर शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी तयार केलेली दिवाळी शुभेच्छा भेट कार्ड सैनिकांंना पाठविण्यात येणार आहेत. भारत विकास परिषदेतर्फे सीमावर्ती भागात लष्करी जवानांना दिवाळी फराळ पाठविण्याची ही तिसरी वेळ आहे.
गेल्या वर्षी देशाच्या नऊ सीमांवरील पाच हजार जवानांना दिवाळी सणाच्या काळात दिवाळी फराळ वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी दहा हजार दिवाळी फराळाचे डबे सीमेवरील जवानांना पोहचविण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी सुमारे ५० लाख रूपये खर्च प्रस्तावित आहे. देशप्रेमी नागरिक, लोकसहभागातून ही उभी रक्कम उभी केली जात आहे, असे संयोजकांनी सांगितले.
दिवाळी फराळाचे डबे भरण्याचा उपक्रम सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या वेळी मुंबईतील नेव्ही नगर भागातील लष्कराचे जवान सुभेदार कर्तार सिंग राजपूत, माजी नौदल सैनिक पद्मश्री गजानन माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव जोशी, भारत विकास परिषदेच्या अध्यक्षा ॲड. वृंदा कुळकर्णी, कुळकर्णी ब्रदर्सचे संचालक नव उद्योजक चिन्मय कुलकर्णी, कानिटकर लाडूचे श्रीजय कानिटकर, अश्वमेध कुरियरचे केदार नवरे उपस्थित होते. ना नफा ना तोटा तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नव उद्योजक चिन्मय कुलकर्णी, श्रीजय कानिटकर, केदार नवरे दिवाळी फराळ तयार करण्यापासूनची तयारी, ते बंदिबस्त करून ते सीमेवर पोहचविण्याच्या कामासाठी सेवा देत आहेत. लष्करी प्रशासनाच्या आवश्यक मंजुऱ्या घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या दिवशी आपल्या घरगुती पध्दतीचा करंजी, चकली, बेसन, रवा लाडू, चिवडा असा विविध प्रकारचा दिवाळी फराळ खाण्यास मिळत असल्याने सीमेवरील जवान समाधान व्यक्त करतात, असा अनुभव या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सेवाव्रतींनी सांगितला.
या उपक्रमात डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ॲड. वृंदा कुळकर्णी यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९८२१४२९६७७, ९८९२२५८९२३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन भारत विकास परिषदेतर्फे करण्यात आले आहे.