डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागातील वीर जिजामाता भोसले रस्त्यावरील ११ गाळ्यांमुळे रस्ता रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. गेल्या वर्षापासून पालिकेच्या ह प्रभागातील अधिकारी गाळे तोडण्यासाठी प्रयत्नशील होते. स्थानिकांचा विरोध असल्याने गाळे तोडण्यात अडचणी येत होत्या. पोलीस बंदोबस्तात पालिका अधिकाऱ्यांनी हे गाळे जमीनदोस्त केले.
सुभाष रोड, नवापाडा भागात नागरी वस्ती वाढली आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. या भागात अरूंद रस्ते, फेरीवाल्यांमुळे सकाळपासून वाहन कोंडी होते. गेल्या दोन वर्षापासून पालिकेने सुभाष रोड, नवापाडा, गरीबाचापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागातील रस्ते रूंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत.




गेल्या वर्षी पालिकेने स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या सहकार्याने नवापाडा भागातील रस्ता रुंदीकरणाची कामे पूर्ण केली. या भागातील वीर जिजामाता भोसले मार्गावरील ११ गाळेधारकांनी रस्ता रूंदीकरणासाठी जमिनी देण्यास विरोध केला होता.त्यामुळे भोसले मार्गावरील निम्म्या रस्त्याचे काम रखडले होते. उपअभियंता लिलाधर नारखेडे, साहाय्यक अभियंता महेश गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली ही कामे पूर्ण केली जात आहेत. भोसले मार्गाचा काही भाग गाळेधारकांनी अडविला होता. या मार्गावरील गाळेधारकांना ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गाळे रिकामे करण्याच्या नोटिसा बजावल्या. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने वीर जिजामाता भोसले मार्गावरील ११ गाळे जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. या गाळ्यांमुळे या भागात वाहन कोंडी होत होती.
विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यावेळी उपस्थित होते. कारवाईच्या नोटीसा मिळताच गाळेधारकांनी गाळे रिकामे केले होते. त्यामुळे कारवाईच्या वेळी कोणीही गाळेधारक विरोध करण्यासाठी पुढे आला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
देवीचापाडा येथील सत्यवान चौक ते चकाचक मंदिर रस्ता पालिकेने लवकर पूर्ण करावा अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.