डोंबिवली जवळील २७ गाव ग्रामीण भागातील मनसेच्या दोन नगरसेवक आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील एका संचालकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेतील एका उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मनसेच्या स्थानिक नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, बैठका घेतल्या जात नाहीत. ठराविक कोंडाळ्यात स्थानिक नेतृत्व असल्याने मनसेत काम करणे अवघड झाल्याने तिन्ही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

मनसेचे दोन नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करतील. तसेच, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकांनीही आपल्या साथीदारांसह मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ग्रामीणमधील शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. मनसे नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला यासंदर्भात संपर्क केला. त्यांनी यासंदर्भात आपणास काही माहिती नसल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देताच, कोणत्याही क्षणी पालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही नगरसेवकांचे शिवसेना प्रवेश विशेष महत्वाचे मानले जातात. २७ गाव ग्रामीण भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागातील सेनेचे वर्चस्व अबाधित रहावे आणि वाढावे या उद्देशातून ग्रामीण भागातील अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचा सपाटा सेनेने लावला आहे. गेल्या वर्षी काटई गावातील निष्ठावान मनसे कार्यकर्ते अर्जुन पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून २७ गाव ग्रामीण, कल्याण तालुक्यात मनसेला गळती लागली आहे. पालिका निवडणुका जाहीर होताच ग्रामीणमधील अनेक मनसे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील, असे सेनेच्या उच्चपदस्थाने सांगितले. हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवलीतील भाजप, राष्ट्रवादीमधील ९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.