डोंबिवली – गेल्या दोन वर्षापासून भाजपमध्ये नाराज असलेले, पण भाजप नेत्यांनी वेळोवेळी शांत करून भाजपमध्ये रोखून धरलेले, भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील काही महिन्यांपासून विकास म्हात्रे यांच्या प्रभागांमधील फलकांवर भाजपचे कमळ चिन्ह, भाजप नेत्यांची नावे गायब असल्याने त्यांच्या शिंदे शिवसेनेतील पक्ष प्रवेशाला बळकटी मिळत आहे.
दिवाळीपूर्वी माजी नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे फाऊंडेशनच्या शिंदे शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी दिवाळी शिधा वाटपाचा कार्यक्रम देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकात आयोजित केला होता. या फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला विकास म्हात्रे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, विकास म्हात्रे आणि संदेश पाटील अशा चार जणांच्या प्रभागात (बहुसदस्य प्रभाग) सुमारे दहा हजार महिलांना रवा, मैदा, साखर असा जिन्नस वाटप करण्यात आला.
मागील दोन वर्षापासून विकास म्हात्रे भाजपमध्ये नाराज आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन वेळा गरीबाचापाडा प्रभागात विकास कामे होत नाहीत. विकासासाठी निधी मिळत नाही, अशी कारणे देऊन सपत्नीक पक्षाचा राजीनामा दिला आहे. परंतु, वेळोवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी त्यांचे सांत्वन केले. काही महिन्यापूर्वी नाराज विकास म्हात्रे यांची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून दिली होती. त्यानंतर आपण भाजपमध्ये राहणार असल्याची ग्वाही म्हात्रे यांनी भाजप नेत्यांना दिली होती.
आता पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर चार सदस्य प्रभाग पध्दतीत आपण शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या साथीशिवाय आपण प्रभागात आपले भवितव्य अजमावू शकत नाही याची जाणीव झाल्याने विकास म्हात्रे यांनी शिंदे शिवसेने बरोबर सलगी वाढवली आहे. शिंदे शिवसेनेच्या वजनदार नेत्यांनी तुम्हाला थेट यायचे असेल तर या असे आमंत्रण दिल्याने विकास म्हात्रे कोणत्याही क्षणी भाजप बरोबर पंगा घेऊन शिंदे शिवसेनेत उडी घेण्याच्या तयारीत आहेत.
यापूर्वी नाराज विकास म्हात्रे यांंचा राजीनामा भाजपने मंजूर केलेला नव्हता. दिवाळीनिमित्त भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी गरीबाचापाडा प्रभागात लावलेल्या भाजपच्या शुभेच्छा फलकावर विकास म्हात्रे यांची प्रतिमा लावली आहे. या प्रकारामुळे विकास म्हात्रे नाराज झाले आहे. आपण भाजपचा राजीनामा दिला आहे. तरीही आपल्या प्रतिमा भाजपच्या फलकावर का लावल्या, असे प्रश्न आपण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना केला आहे.
आपल्या प्रभागात रस्ते, इतर विकास कामे झाली नाहीत. निधी मिळाला नाही. त्यामुळे आपण भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आपल्या प्रतिमा भाजपच्या फलकावर लावू नयेत, असे आपण परब यांना कळविले आहे, असे विकास म्हात्रे यांनी माध्यमांना सांंगितले. या हालचालींमुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. अधिक माहितीसाठी भाजपचे नंदू परब, विकास म्हात्रे यांना संपर्क साधला. तो होऊ शकला नाही. म्हात्रे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांचा राजकीय मार्ग खडतर होण्याची चर्चा आहे.