डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली, मोठागाव, कोपर भागात सुरा हातात घेऊन रस्त्यावर फिरत दहशत पसरविणाऱ्या मोठागाव डोंबिवलीतील पकोडी नावाच्या गुंडाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक शस्त्र घेऊन फिरण्यास मनाई असताना पकोडी गुंड हातात सुरा घेऊन लोकांच्या अंगावर मारण्यास धाऊन दहशत पसरविता होता.

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन भोसले आपल्या पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना माहिती मिळाली की जुनी डोंबिवली स्मशानभूमी रस्त्यावर एक तरूण हातात धारदार सुरा घेऊन एकेकाला आता बघतो अशी भाषा करत लोकांच्या अंंगावर सुरा घेऊन मारण्यास धावत होता. या प्रकाराने जुनी डोंबिवली परिसरातील रहिवासी पकोडी गुंडाला पाहून घाबरून पळून जात होते. काही रहिवाशांनी आपल्या घराचे दरवाजे बंद करणे पसंत केले होते.

हवालदार भोसले यांनी ही माहिती तात्काळ साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे यांना दिली. लोखंडे यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांना दिली. चोपडे यांनी संबंधित गुंडाला अटक करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे साहाय्यक उपनिरीक्षक जमादार, हवालदार मोरे, सायसिंग यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे सुऱ्याने दहशत पसरविणारा गुंड आढळला नाही. पोलीस पथकाने परिसरातील रहिवाशांना विचारणा केली तेव्हा तो सुराधारी गुंड मोठागाव, कोपर भागात रस्त्याने हातामधील सुरा हवेत फिरवत एकेकाला मी बघून घेतो असे बोलत चालला असल्याचे दिसले. हाच तो गुंड असल्याची खात्री पटल्यावर पोलीस पथकाने त्याच्या हातात सुरा असल्याने तो जीवाला धोका निर्माण करण्याची शक्यता असल्याने पोलीस पथकाने पकोडी गुंडाला गाफील ठेऊन त्याच्या हातामधील पहिले सुरा काढून घेतला. त्यानंतर त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला अटक केली.

त्याचे नाव संदीप पारस गुप्ता उर्फ पकोडी (२२) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तो मोठागाव मधील निसर्ग हाॅटेलमधील विघ्नहर्ता चाळीत राहतो. पकोडीच्या ताब्यात तेरा इंच लांबीचा सुरा सापडला आहे. सुरा पकोडीने कोठुन आणला आहे. तो सुरा घेऊन कोणावर हल्ला करणार होता, याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे करत आहेत. काही दिवसापूर्वीच डोंबिवली पूर्वेतील टाटा नाका, खंबाळपाडा रस्त्यावर स्थानिक पोलिसांनी दोन सुराधारी, कोयताधारी गुंडांना अटक केली होती.