डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत मानपाडा रस्त्यावरील चार रस्त्यावर वाहतूक दर्शक (सिग्नल) यंत्रणा रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. सर्वाधिक वर्दळीच्या चार रस्त्यावरील दर्शक यंत्रणा कार्यान्वित झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. दर्शक यंत्रणेमुळे डोंंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांची या चौकातील वाहतूक नियोजनाची डोकेदुखी कमी झाली आहे.
तीन ते चार वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागातर्फे चार रस्त्यावर वाहतूक दर्शक बसविण्यात आले होते. परंतु याठिकाणी वाहतूक दर्शकाचे खांब बसविल्यानंतर त्यांचा या भागातील सीमेंट काँक्रीट रस्ते करताना अडथळा येत होता. तसेच, दर्शक यंत्रणा बसविताना दर्शक इशारे दिव्यांची दिशा उलटसुलट झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी टीका केली होती. त्यानंतर चार रस्ता चौकातील वाहतूक दर्शक यंत्रणा बंद करण्यात आली होती.
डोंबिवली शहरातील चार रस्ता चौक हा सर्वाधिक वाहतूक वर्दळीचा चौक ओळखला जातो. शिळफाटा रस्त्यावरून येणारी वाहतूक, डोंबिवली शहरांतर्गत, कल्याण आणि इतर भागातून येणारी वाहने या चौकातून धावतात. त्यामुळे वाहतूक पोलीस या चौकात नसला तर अभूतपूर्व अशा कोंडीने हा चौक गजबजून जातो. या रस्त्यावरील वाहनांचा वाढता भार विचारात घेऊन वाहतूक पोलिसांना या चौकात वाहनांचे नियोजन करताना दररोज कसरत करावी लागत होती. वाहतूक विभागही या चौकात दर्शक यंत्रणा बसविण्यासाठी प्रयत्नशील होता.
गेल्या आठवड्यात चार रस्त्यावर दर्शक खांब आणि दर्शक दिवे यंत्रणा बसविण्यात आली. या दर्शकांच्या योग्य त्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर दर्शक सुस्थितीत चालतो याची खात्री पटल्यावर रविवारी चार रस्त्यावरील दर्शक कल्याण डोंबिवली पालिका स्मार्ट सिटी विभाग आणि वाहतूक विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. ही दर्शक यंत्रणा सुस्थितीत चालेल यासाठी पालिका स्मार्ट सिटी विभाग आणि वाहतूक विभागाने प्रयत्न करावेत.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (घरडा सर्कल) दर्शक यंत्रणेप्रमाणे चार रस्त्यावरील दर्शक यंत्रणेचा खेळ होऊ नये अशी मागणी प्रवासी करत आहेत. घरडा सर्कल येथील दर्शक दोन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. या दर्शकातील वाहने रोखण्याच्या वेळा अधिक प्रमाणात होत्या. त्यामुळे दर्शकामुळे वाहतूक सुस्थितीत राहण्याऐवजी या चौकात वाहतूक कोंडी होत होती. प्रवाशांकडून या नियोजनावर टीका करण्यात येत होती. अखेर पालिका आणि वाहतूक विभागाने शिवाजी महाराज चौकातील दर्शक वेळेचे बंधन काढून टाकून झकपक पध्दतीने सर्व वाहनांना चारही बाजू खुल्या पध्दतीने सुरू ठेवला होता.
डोंबिवली कल्याण शहरातील महत्वाच्या वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक दर्शक बसविण्याची प्रवाशांची मागणी आहे. चार रस्ता भागात एकावेळी तीन ते चार वाहतूक पोलीस, सेवक तैनात असतात. त्यांची नियुक्ती ठाकुर्ली उड्डाण पूल, चोळे रस्ता, पाथर्ली, इंदिरा चौक, फडके रस्ता भागात करण्याची प्रवाशांची मागणी आहे.