डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागात एका भूखंडावरील शिवदास आर्केड इमारतीमधील सदनिका विक्रीच्या माध्यमातून तीन भूमाफियांनी डोंबिवली आणि दिवा गावातील एकूण पाच जणांची गेल्या वर्षभरात २० लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. घर देणार नसाल तर आमचे पैसे परत करा, असे सतत सांगुनही तिन्ही भूमाफियांनी पाचही घर खरेदीदारांना घर नाहीच, पण त्यांचे पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्रस्त घर खरेदीदारांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात भूमाफियांविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील भोईरवाडी भागातील सिल्व्हर काॅईन इमारतीत राहणारे अक्षय भारत पवार (३३) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नागेश नारायण चिरमुले (रा. मोठागाव, डोंबिवली), सुनील मधुकर सावंत (रा. भांडुप), दिनेश काळू जोशी (रा. डोंबिवली) यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ११८(१), ११५(१), ३२४(४), ३५१(२) ३(५) कलमाने गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग येडगे, चंद्रकांत येडगे (रा. दिवा), अक्षय पवार, कुलदीप मालुसरे, राजेंद्र खोडदे अशी घर खरेदीत फसवणूक झालेल्या नागरिकांची नावे आहेत.

ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा येथील सर्वे क्रमांक २४५-१ वरील शिवदास आर्केड गृहसंकुल येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की डोंबिवली नवापाड्यात एका निर्माणाधिन इमारतीत कुलदीप मालुसरे, खोडदे यांनी घरांची नोंदणी केली होती. या दोघांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अक्षय पवार यांनीही या इमारतीत घर खरेदी केली. नागेश चिरमुले, गायत्री मांजरेकर यांच्या माध्यमातून अक्षय यांनी कुटुंबीयांसह नवीन घराची पाहणी केली.

माफियांनी सुरूवातीला २८ लाख घराची किमंत सांगितली. कमी करून १७ लाखाला घर खरेदीचा प्रस्ताव अक्षय पवार यांनी मान्य केला. या इमारतीच्या जमिनीचे मालक दिनेश काळु जोशी असल्याचे घर खरेदीदारांना सांगण्यात आले. अक्षय यांनी श्री स्वामी समर्थ एन्टरप्रायझेसच्या नावाने माफिया चिरमुले यांना पाच लाखाचा धनादेश दिला. डिसेंबरपर्यंत घराचा ताबा देण्याचे नागेश यांनी पाचही जणांना आश्वासन दिले होते. चंद्रकांत आणि पांडुरंग येडगे यांनी घर खरेदीसाठी १० लाखाचा भरणा भूमाफियांकडे केला. खोडदे, मालुसरे यांनी एकूण साडे पाच लाखाचा भरणा माफिया नागेश चिरमुलेकडे केला होता.

डिसेंबर २०२४ मध्ये पाचही घर खरेदीदारांनी नागेश चिरमुले यांच्याकडे घराचा ताबा मिळविण्यासाठी आग्रह केला. नागेश यांनी जमीन मालक आणि विकासक यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे घराचा ताबा मिळण्यास विलंब होत अशी कारणे घर खरेदीदारांना दिली.

नागेश यांनी जमीन मालक दिनेश जोशी, सुनील सावंत यांच्या सोबत घर खरेदीदारांची भेट घालून दिली. त्यांनी विकासकाबरोबरचा विषय मिटला की तुम्हाला घराचा ताबा देतो असे सांगितले. त्यानंतर विविध कारणे देऊन नागेश आणि सहकारी घर नाहीच पण घर खरेदीदारांचे पैसेही परत देण्यास तयार नव्हते. त्यांनी दिलेले लाख रूपयांचे धनादेश बँकेत वटले नाहीत. हे तिन्ही माफिया आपली फसवणूक करत आहेत याची खात्री पटल्यावर अक्षय पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे तपास करत आहेत.