डोंबिवली : मुंबईत चाळीत राहण्यापेक्षा डोंबिवलीत स्वस्तात घर घेऊ असा विचार करून बारा वर्षापूर्वी मुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी भागातील दोन मजूर कष्टकऱ्यांनी डोंबिवली पूर्वेतील सागर्ली भागात भूमाफियांकडून घर खरेदीचा निर्णय घेतला. भूमाफियांच्या सांगण्याप्रमाणे या दोन्ही कष्टकऱ्यांनी घर खरेदीच्या नोंदणीसाठी एकूण दहा लाख ५० हजाराच्या आगाऊ रकमा भूमाफियांकडे ऑनलाईन स्वरूपात जमा केल्या. आता बारा वर्ष होत आले तरी तीन भूमाफियांकडून घराचा ताबा मिळत नसल्याने घर खरेदीदारांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तीन भूमाफियांच्या विरुध्द तक्रार दाखल केली आहे.

अलीकडे डोंबिवलीत घर खरेदी करताना भूमाफियांकडून घर खरेदीदारांची अधिक प्रमाणात फसवणूक केली जात आहे. याप्रकरणाचे गुन्हे डोंबिवली परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या प्रकरणात शासनाने लक्ष घालण्याची मागणी फसवणूक झालेले नागरिक करत आहेत. डोंंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात भैरवनाथ सुभाष आखाडे (४५) यांंनी घर खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. आखाडे हे मुंबईतील जोगेश्वरी भागातील बांद्रेकरवाडी भागात एका चाळीत राहतात. ते रंगारी म्हणून काम करतात. आखाडे यांच्या प्रमाणे घर खरेदीत फसवणूक झालेले अनिल भानुदास निकम (५४) हे मुंबईतील अंधेरी साकीनाका भागातील चांदिवली म्हाडा काॅलनीत राहतात.

डोंबिवली पूर्वेतील श्रीनाथ एन्टरप्रायझेसतर्फे डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील सागर्ली येथे अनंंततारा गृहसंकुल नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित इमारतीत या दोन तक्रारदारांची फसवणूक झाली आहे.

भैरवनाथ आखाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संतोष भोईर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. भोईर हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील भोईरवाडीतील गोकुळ बंगल्या जवळील तुलसी विहार सोसायटीत राहतात. दुसरा गुन्हा दाखल नरेंद्र वर्मा हे महाराष्ट्र नगरमध्ये माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या गृहसंकुल परिसरात राहतात. तिसरे दिलीप जोशी. अशा तीन भूमाफियांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर २०१४ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

भैरवनाथ आखाडे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे, की मी आणि माझा सहकारी अनिल निकम याने डोंबिवलीत बारा वर्षापूर्वी घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीप्रमाणे आम्ही नवीन इमारत उभारणारे संतोष भोईर, दिलीप जोशी आणि नरेंद्र वर्मा यांच्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील निळकंठ प्लाझा इमारतीमधील गाळा क्रमांक पाचमधील श्रीनाथ एटंरप्रायझेसच्या कार्यालयात संपर्क केला. आम्हाला या तीन बांधकामधारकांनी सागर्ली येथे आम्ही अनंततारा नावाने नवीन इमारत उभारत आहोत, असे सांगितले.

या इमारतीचा आराखडा या दोघांना दाखविला. या नवीन इमारतीत घर खरेदीची नोंदणी करण्यासाठी सात लाख ५० हजार रूपये भैरवनाथ यांच्याकडून, अनिल निकम यांच्याकडून तीन लाख रूपये ऑनलाईन माध्यमातून त्यांच्या बँक खात्यावर माफियांनी जमा करून घेतले. त्यानंतर सागर्ली येथे कोणतीही नवीन इमारत न बांधता, आम्हाला सदनिका न देता आमच्या रकमेचा अपहार या बांधकामधारकांनी केला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. उपनिरीक्षक देवरे तपास करत आहेत.