कल्याण – एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका इसमाला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक न्यायालयाचे विशेष जिल्हा न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी २० तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. आणि एक हजार रूपयांचा दंड ठोठावला.
राहुल राजू जाधव (३३) असे या इसमाचे नाव आहे. तो डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात राहतो. मानपाडा पोलीस ठाण्यात या लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सप्टेंबर २०१९ मध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची चौकशी करून राहुल जाधव याला अटक केली होती. मुलीच्या आईची तक्रार आणि मुलीने दिलेला जबाब आणि इतर सोळा साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला कठोर २० वर्ष तुरूंगवासाच्या शिक्षेचा निर्णय दिला.
याप्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. अश्विनी भामरे पाटील आणि ॲड. जे. आर. बठेजा यांनी काम पाहिले. मानपाडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक मनीषा जोशी यांंनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले. पोलीस ठाणे आणि न्यायालयातील समन्वयक अधिकारी म्हणून हवालदार ए. आर. गोगरकर, साहाय्यक उपनिरीक्षक गोपाळ निकम, ए. डी. बाशिंगे, प्रवीण माने यांनी काम पाहिले.
गुन्ह्यातील माहिती अशी, की पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह २७ गाव परिसरात राहते. आरोपी इसम या मुलीच्या घर परिसरात राहत होता. त्यांची तोंड ओळख झाली होती. मुलगी १६ वर्षाची अल्पवयीन आहे हे माहिती असुनही आरोपी राहुल जाधव याने पीडितेला एकांतात गाठून तिच्यावर मार्च २०१९ मध्ये लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून पीडितेवर दबाव टाकला. त्यामुळे पीडितेने हा विषय कुटुंबीयांसह मैत्रिणींना सांगितला नाही.
सप्टेंंबर २०१९ मध्ये पीडितेची मोठी बहिण गणेशोत्सवानिमित्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पीडित मुलीच्या घरी आली. त्यावेळी तिला आपली लहान बहिण गर्भवती असल्याचे जाणवले. तिने हा विषय पीडित मुलीला न सांगता तिच्या आईला सांगितला. आईने आपली मुलगी अंगाने किरकोळ आणि ती सैल कपडे घालत असल्याने आपल्या काही हा प्रकार समजला नाही, असे आपल्या मोठ्या मुलीला सांगितले.
पीडितेची आई आणि मोठ्या बहिणीने पीडित मुलीला विश्वासात घेऊन तुझ्या बाबतीत काय घडले ते सांग, अशी विचारणा केली. तिने तिच्या बाबतीत आरोपीने इसमाने केलेला प्रकार सांगितला. आरोपीचे नाव सांगण्यास नकार दिला. आपणास मार्चपासून मासिक पाळी आली नसल्याचे आई, मोठ्या बहिणीला तिने सांगितले.
संशय अधिकचा बळावल्याने कुटुंबीयांनी प्रेग्नन्सी कीट आणून घरातच पीडितेची गर्भ चाचणी केली. ती गर्भवती असल्याचे कीटच्या माध्यमातून कुटुंबीयांना समजले. पीडितेला शीव येथे लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथील चाचणीत पीडिता सात महिन्याची गरोदर असल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले. या घटनेनंतर पीडितेच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणा विरुध्द तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पीडितेच्या साक्षीतून आरोपीचे नाव निष्पन्न करून अटक केली होती.