डोंबिवली : पादचारी वृध्द महिलांना रस्त्यात एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून पलायन करणाऱ्या उत्तरप्रदेशातील तीन सराईत चोरट्यांना येथील रामनगर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने अटक केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चोरट्यांकडून एक रिव्हाॅल्व्हर, चार जिवंत काडतुसे आणि तीन लाख ८० हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अभय सुनील गुप्ता (२१, कुमारनटोला, गोकर्णनाथ, उत्तरप्रदेश), अभिषेक ओमप्रकाश जौहरी (३२, रा. कोतवाली, फतेपूर, उत्तरप्रदेश), अर्पित उर्फ प्रशांत शुक्ला (२७, रा. खमरिया, लखीमपुरा, उत्तरप्रदेश) अशी अटक गुंडांची नावे आहेत. गेल्या महिन्यापासून डोंबिवलीत पादचारी वृध्द, ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोनसाखळी लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. गेल्या आठवड्यात ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागात कांचनगाव येथे चामुंडा गार्डन सोसायटीत राहणाऱ्या थंकमणी नायर (६५) संध्याकाळच्या वेळेत दुकानातून सामान घेऊन घरी पायी चालल्या होत्या. त्या सोसायटीच्या प्रवेशव्दारात जाताच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाखाहून अधिक रकमेची सोन्याची साखळी चोरून नेली होती.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या चोरट्यांना अटक करण्यासाठी साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, रामनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना निर्देशीत केले होते. उपायुक्त झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अच्चुयत मुपडे, उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांचे विशेष शोध पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने नायर यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटला त्या ठिकाणापासून ते परिसरातील १०६ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात एमएच २० एफआर १८५१ क्रमांकाच्या दुचाकीवरून चोरटे चोऱ्या करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दुचाकी मालकाचा शोध घेतला. त्याने आपली दुचाकी नारायण पेठ पुणे येथून गेल्या महिन्यात चोरीला गेली आहे, असे सांगितले.
तपास सुरू असताना आरोपी डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर भागात येणार आहेत अशी गुप्त माहिती उपनिरीक्षक चव्हाण यांना मिळाली. पथकाने त्या भागात सापळा लावून तीन इसमांना ताब्यात घेतले. या तिन्ही इसमांनी आपण डोंबिवली, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून चोरीचा तीन लाख ८० हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. सोन्याची चार ग्रॅम वजनाची लगड, २४ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जप्त केले आहे. अर्पित शुक्लावर उत्तरप्रदेशात खुनाचा गुन्हा दाखल आहे. हे तिन्ही आरोपी पोलीस कोठीडत आहेत, असे उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.
या गुंडांवर पुणे येथील विश्रामबाग, हारगाव, बिबेवाडी, हडपसर, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. डोंबिवलीत रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत विक्रम गौड, राजेंद्र खेडकर, अच्युत मुपडे, प्रसाद चव्हाण हे पोलीस अधिकारी आणि हवालदार सुनील भणगे, मंगेश शिर्के, देविदास पोटे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन सांगळे, राजेंद्र सोनावणे, प्रशांत सरनाईक, शिवाजी राठोड सहभागी झाले होते.