डोंबिवली – डोंबिवली जवळील कल्याण शीळफाटा रस्त्यावरील निळजे गावातील एका मुख्याध्यापकाला शाळेतील एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी शनिवारी मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.
महेंद्र गोपाळ खैरनार असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि पोलिसांनी अटक केलेल्या प्रभारी मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते ठाणे जिल्हा परिषदेच्या निळजे गावातील शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्याकडे निळजे गाव जिल्हा परिषद शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार आहे. निळजे गावात ठाणे जिल्हा परिषदेची इयत्ता सातवी पर्यंत शाळा आहे.
शाळेतील एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर मुख्याध्यापक महेंद्र खैरनार यांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीचे पालक आणि ग्रामस्थांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली होती. शाळेत मधली सुट्टी झाली त्यावेळी खैरनार यांनी आपल्याशी गैरप्रकार केल्याची तक्रार पीडित मुलीने आपल्या आई, वडिलांकडे केली होती. या प्रकाराने संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकाला जाब विचारला. हा प्रकार ऐकून निळजे ग्रामस्थ संतप्त झाले. असे प्रकार शाळेत खपवून घेतले जाणार नाहीत. असा शिक्षक शाळेत असेल तर कोण पालक आपल्या मुलींना पाठवेल, असे प्रश्न शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केले.
काही राजकीय मंडळींना हा प्रकार समजताच त्यांनी खैरनार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. मानपाडा पोलिसांनी पालक आणि ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. त्यांना तात्काळ अटक केली. त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या शिक्षकाने यापूर्वीही गैरकृत्य केले होते. त्यांच्या या कृत्याची तक्रार आम्ही जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. पण त्या तक्रारीची शिक्षण विभागाने दखल घेतली नाही. त्यामुळे या शिक्षकाला अशी कृत्ये करण्यास बळ मिळत आहे. या शिक्षकावर आता शिक्षणाधिकारी विभागाकडून कठोर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरे गटाचे नेते मुकेश भोईर यांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाने हे कृत्य केल्याने २७ गाव परिसरात संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकाला फाशी देण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.