श्रावण महिन्यात केळीच्या पानांना विशेष मागणी असते. या मागणीचा विचार करुन रानकेळीच्या पानांच्या किमती वाढल्या आहेत. रानकेळीची यापुर्वी पाच ते १० रुपयांमध्ये मिळणारी पाने आता २० रुपयांना तीन पाने मिळू लागली आहेत. पाने खरेदी करताना आता नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

कसारा, कर्जत, खर्डी, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली भागातील आदिवासी महिला अनेक वर्ष रानकेळीची पाने श्रावण महिन्यात मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात विकतात. गणपती, नवरात्रोत्सवापर्यंत रानकेळीची पाने शहरी भागात विकण्याची कामे या महिला करतात. यापूर्वी पाच ते दहा रुपयांना तीन ते चार पाने मिळत होती. आता महागाई वाढल्याची जाणीव झाल्याने आदिवासी महिला रानकेळीची तीन पाने २० रुपयांना विक्री करत आहेत.

श्रावण महिन्यात घरातील धार्मिक विधी, केळीच्या पानावरील भोजनाला विशेष महत्व आहे. शहरी भागात नागरिकांची गरज ओळखून कर्जत, कसारा आदिवासी भागातील महिला दररोज केळीची पाने घेऊन रेल्वे स्थानक भागात येतात. सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे स्थानक भागात केळी पाने विक्रीचा व्यवसाय करुन मिळेल ती लोकल वाहने पकडून ती पुन्हा आपल्या मूळ गावी जातात.

रानकेळीचा व्यवसाय –

भात लागवडीचा हंगाम असल्याने आदिवासींना अन्य कोणतेही काम नसते. आदिवासी भागातील घराघरातील पुरुष, महिला मंडळी दिवसा जंगलात जातात. हिंस्त्र प्राण्यांची भीती असते. त्या परिस्थितीवर मात करत उपजीविकेसाठी ही मंडळी ते आव्हान स्वीकारतात. रानकेळीची पाने दुपारपर्यंत कापून त्याची ओझी घरी आणली जातात. त्याची १०० पानांची ओझी तयार केली जातात. ही ओझी डोक्यावरुन घरापासून ते रेल्वे स्थानकापर्यंत आणली जातात. लोकलच्या दरवाजात ओझी प्रवाशांना चढउतार करायला त्रास होणार नाही सुस्थितीत ठेऊन ही मंडळी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण भागाचा प्रवास करतात. श्रावण ते नवरात्रोत्सवापर्यंत आदिवासी मंडळींचे रानकेळीची पाने विक्री हा मोठा व्यवसाय असतो. एक आदिवासी या पान विक्रीतून दोन महिन्यात लाखभराचा व्यवसाय करतो, असे या विक्रेत्यांनी सांगितले.

कसारा भागातून केळीची पाने कल्याण-डोंबिवलीत विक्रीसाठी आणतो –

“आम्ही दररोज कसारा भागातून केळीची पाने कल्याण-डोंबिवलीत विक्रीसाठी आणतो. सकाळी आणलेली पाने रात्री उशिरा पर्यंत संपतात. घरी पुरुष मंडळींनी आणून ठेवलेली पाने घेऊन पुन्हा सकाळी शहराच्या दिशेने प्रवास करतो.”, अशी माहिती कसारा भागातील हरणूबाई पोकळा या महिलेने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे स्थानकातील जिने, मोकळ्या जागेत पानांचे गठ्ठे ठेऊन आदिवासी महिला पानांची विक्री करतात. नागरिकांची ताजी पाने महाग असली तरी खरेदीसाठी झुंबड करत आहेत.