कल्याण- रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेने दोन वर्षापूर्वी इंडियन कॅटरिंग ॲन्ड कार्पोरेशनच्या सहकार्याने फलाटांवर जनजल योजनेसाठी चौक्या उभाऱल्या होत्या. अल्प दरात याठिकाणी प्रवाशांना पाणी उपलब्ध होत होते. करोना महासाथीच्या काळात ही योजना बंद पडली. रेल्वे स्थानकांवरील जुनीपुराणी जलशीत सयंत्रांमध्ये बिघाड झाला आहे. नळ जोडण्यांमधून पुरेशा दाबाने पाणी येत नाही. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रवाशांचे पाणी उपलब्ध नसल्याने हाल होत आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नऊ रेल्वे स्थानकांवरील जनजल योजनेच्या चौक्या बंद आहेत. या चौक्यांचा आधार घेऊन भटकी कुत्री, भिकारी बसलेले असतात. या चौक्यांमुळे फलाटावरील पाच बाय पाच फुटाची जागा अडली आहे. जनजल योजनेतून पाणी घेण्यासाठी प्रवाशाने नाणे सयंत्रात टाकले की प्रवाशाला पाणी मिळत होते. तसेच, योजनेतील तिकीट खिडकीजवळ बसलेली महिला प्रवाशांना पाणी विक्री करण्याचे काम करत होती.

३०० मिलिलीटरचे साधे पाणी एक रूपया, थंडपाणी दोन रूपये, ५०० मिलिलीटरचे पाणी तीन रूपये, पाच रूपये, एक लीटर पाणी पाच रूपये, ८ रूपये, दोन लीटर पाणी आठ रूपये, १२ रूपये, पाच लीटर पाणी २० रूपये, २५ रूपये दराने विकले जात होते. २४ तास ही सेवा फलाटावर असल्याने मेल, एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फलाटावर गाडी थांबली की तात्काळ जनजल योजनेतून मुबलक पाणी खरेदी करणे शक्य होत होते. ही योजना बंद असल्याने प्रवाशांना फलाटावरील नळावर जावे लागते. नळांमधून मुबलक पाणी येत नाही. परिसरातील झोपडपटटीतील मुलांनी अनेक ठिकाणचे नळ चोरून नेलेत, तोडून टाकले आहेत. रेल्वे स्थानकातील जुनाट जलशीत सयंत्र बिघडली आहेत. त्यांची देखभाल केली जात नसल्याने या संयत्रांच्या भोवती घाण असल्याने कोणी प्रवासी याठिकाणी पाणी पिण्यास येत नाही. अशी भयावह परिस्थिती सध्या कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, शहाड, आंबिवली, टिटवाळा, कोपर, ठाकुर्ली, मुंब्रा, दिवा स्थानकांमधील फलाटावर पाहण्यास मिळते.

उन्हाचे दिवस असल्याने फलाटावर उतरल्यावर प्रवासी पाण्यासाठी फलाटावर वणवण करतो. त्याला कोठेही पाणी मिळत नाही. नळ कोंडाळ्यावरील पाणी शुध्द असेल याची खात्री नसल्याने आणि या कोंडाळ्याजवळ सतत झोपडपट्टीतील मुले फिरत असल्याने कोणी प्रवासी या नळांवर पाणी पित नाही, असे प्रवाशांनी सांगितले. दिवा, नवीन मुंब्रा स्थानकांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. फलाटावर पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना फलाटावरील उपहारगृह चालकाकडून पाणी खरेदी करावे लागते. मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर सध्या ही परिस्थिती असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात आहेत.

जनजल योजना इंडियन कॅटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पेारेशनकडून चालविली जात होती. करोना महासाथीच्या दोन वर्षात ही सेवा महामंडळाकडून बंद झाली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने यासंदर्भात एक नोटिफिकेशन काढले आहे – अनिलकुमार जैन, जनसंपर्क अधिकारी , मध्य रेल्वे