Badlapur Railway Station / बदलापूर : दसऱ्याच्या उत्सवाची रंगत बदलापूर रेल्वे स्थानकात यंदाही वेगळीच होती. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या प्रवाशांनी “लोकल पूजन” सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवाशांनी फुलांनी सजवलेल्या लोकल गाडीचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मिठाई वाटून उत्सवाचे वातावरण रंगवले.

बदलापुरातून मुंबईकडे दररोज हजारो प्रवासी नोकरी-व्यवसायासाठी लोकल ट्रेनने प्रवास करतात. वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचवणारी आणि पुन्हा घरी सुखरूप आणणारी ही लोकल गाडी प्रवाशांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळे या “जीवनवाहिनी”प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटना दरवर्षी विजयादशमीच्या आधल्या दिवशी लोकल पूजन सोहळा आयोजित करत असते.

दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असल्याने आदल्या दिवशीच बदलापूर रेल्वे स्थानकात हा कृतज्ञता सोहळा संपन्न होत असतो. या सोहळ्याची बदलापूर रेल्वे स्थानकात एक परंपरा आहे.

त्यानुसार बुधवारी सकाळपासूनच बदलापूर स्थानकात उत्सवाचे वातावरण होते. महिला आणि पुरूष प्रवासी सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत स्थानकात जमले होते. महिला प्रवाशांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या, पुरुष प्रवाशांनी स्थानक आणि लोकलची स्वच्छता केली. नंतर फुलांनी लोकल गाडी सजवण्यात आली. सजवलेल्या लोकल गाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रवाशांनी एकमेकांना मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला. महिलांनी फलाटावर पारंपरिक भोंडला आणि गरब्याचा फेर धरून गाण्यांच्या तालावर उत्साह व्यक्त केला.

मान्यवरांचा सत्कार

या सोहळ्यात केवळ गाडीच नाही, तर लोकल सेवेतील योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. रेल्वे स्थानक व्यवस्थापक, त्यांचे सहकारी, मोटरमन, गार्ड, आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस, स्वच्छता कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी, सेवा निवृत्त प्रवासी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यामुळे स्थानकात आपुलकीचे आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले.

प्रवाशांची भावना

बदलापुरात फलाटावर दसऱ्याचा अनोखा उत्सव

“हा सोहळा म्हणजे केवळ पूजन नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील साथीदार असलेल्या लोकल गाडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. प्रत्येक वर्षी अश्विन शुद्ध नवमीला प्रवासी यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.” अशी माहिती रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी दिली.

दसऱ्याच्या सणात जसा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो, तसाच बदलापुरातील हा लोकल पूजन सोहळा प्रवाशांच्या आयुष्यातील श्रमांना दिलासा देणाऱ्या लोकल गाडीला दिलेला मानाचा मुजरा ठरला.