बदलापूरः गणेशोत्सव हा भक्तिभावासोबतच पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा संदेश देणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे आगळावेगळा आणि कौतुकास्पद संकल्प राबवला आहे. विसर्जनावेळी जमा होणारे निर्माल्य नदीत टाकून जलप्रदूषण वाढवण्याऐवजी त्याच निर्माल्याचा वापर करून कंपोस्ट खत तयार करण्याचे आणि हे खत शहरातील वृक्षारोपण टिकवण्यासाठी वापरण्याचे अभिनव पाऊल प्रतिष्ठानकडून उचलण्यात आले आहे. उल्हास नदी किनारी विसर्जनावेळी हा उपक्रम राबवण्यात आला.
उल्हास नदी प्रदुषण गेल्या काही वर्षात वाढले आहे. नागरी सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी उल्हास नदीत मिसळत असते. त्यामुळे उल्हास नदीत दरवर्षी जलपर्णी जमा होत असते. या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे उल्हास नदी प्रदुषण मुक्त करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत असते. त्यात नदीत सोडले जाणारे निर्माल्य हेही प्रदुषणासाठी कारणीभूत ठरते आहे. गौरी व गणपतींच्या दीड, पाच आणि सात दिवसांच्या विसर्जनावेळी उल्हास नदीकाठी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. परंपरेप्रमाणे हे निर्माल्य थेट नदीत टाकले जात असे. मात्र, यामुळे जलप्रदूषण होऊन नदीचे आरोग्य धोक्यात येते. हे टाळण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो श्री सदस्यांनी विसर्जन घाटांवर निर्माल्या संकलन आणि त्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम राबवला. भाविकांकडून निर्माल्य गोळा करून ते नदीत जाण्यापासून अडवण्यात आले.
हे संकलित निर्माल्य वेगळे करून त्यातील फुलांचा उपयोग कंपोस्ट खत तयार करण्यासाठी केला जाणार आहे. फुलांचे नैसर्गिक विघटन करून सेंद्रिय खत बनवले जाणार असून, त्याची प्रक्रिया प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या मदतीने हाती घेण्यात आली आहे.
झाडांसाठी पोषण, शहरासाठी हिरवाई
या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गेल्या काही वर्षांत प्रतिष्ठानने शहरात केलेल्या वृक्षारोपणाला नवे जीवन मिळणार आहे. झाडे लावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांचे संगोपन करणे आवश्यक असते. अनेकदा पाणी व खताच्या अभावामुळे लावलेली झाडे टिकत नाहीत. परंतु आता निर्माल्यापासून तयार होणारे कंपोस्ट खत या झाडांच्या मुळाशी टाकून त्यांना आवश्यक पोषण मिळणार आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनाची चळवळ अधिक बळकट होणार आहे.
पर्यावरणपूरक आदर्श
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा हा संकल्प फक्त प्रदूषण कमी करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो समाजासाठी पर्यावरणपूरक उपक्रमांचा आदर्श ठरत आहे. धार्मिक उत्सवातही पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. विसर्जन घाटांवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांनी शेकडो भाविकांना निर्माल्य नदीत न टाकता कलशात टाकण्यास प्रवृत्त केले, यावर भाविकांनीही समाधान व्यक्त केले.