भगवान मंडलिक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने गेल्या आठवड्यापासून व्दिधा मनस्थितीत अडकलेल्या डोंबिवली, कल्याणमधील ज्येष्ठ निष्ठावान शिवसैनिकांनी आपली नेहमीची घरगुती वाहने न वापरता मित्र परिवारांच्या वाहनांचा वापर करून गुप्त मार्गाने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या भेटी घेतल्या. तर काही मंडळींनी ठाण्यात जाऊन खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या भेटी घेतल्या असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

भेटी घेणाऱ्या शिवसैनिकांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अशा भेटी झाल्या आहेत, या वृत्ताला दुजोरा दिला. भेटी घेणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांना संपर्क केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही निष्ठावान शिवसैनिकांनी नाव न छापण्याचा अटीवर सांगितले, ‘आम्हाला कुठली तरी एक बाजू घेऊन राजकीय प्रवास करावाच लागणार आहे. त्यामुळे ज्याची ज्याठिकाणी निष्ठा तो त्या ठिकाणी जाणार आहे. आपणही मातोश्रीवर जाऊन आलो आहे. काही जण एकनाथ शिंदे यांना ते गुवाहटित असल्याने भेटू शकत नसले तरी काही मंडळी ठाण्यात जाऊन खा. शिंदे यांची भेट घेत आहेत. हे आता लपून राहिलेले नाही,’ आपण कोणाच्या बाजुचे हे लक्षात येऊन नये म्हणून मातोश्रीवर, ठाण्यात जाताना बहुतांशी निष्ठावान मित्र परिवाराचे वाहन घेऊन मुंबई, ठाणे गाठत आहेत, असे एका निष्ठावान शिवसैनिकाने सांगितले.

निष्ठावान मातोश्री बाजुचे

डोंबिवली, कल्याणमधील जुने लाल टिळेधारी (आनंद दिघे यांच्या पध्दतीने उभा टिळा लावणारे), आनंद दिघे यांचा पगडा असलेला, १९७०-८० च्या दशकापासून शिवसेनेत सक्रिय झालेला बहुतांशी वर्ग शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने भारलेला असल्याने तो आपल्या निष्ठा कोणाच्याही चरणी वाहणारा नाही. शिंदे यांनी या मंडळींना नोकरी, अन्य उद्योग व्यवसायाला लावले असले तरी हा वर्ग शिवसेनाप्रमुखांची शिवसेना सोडून अन्य कोठे जाणार नाही, अशी माहिती डोंबिवलीतील एका निष्ठावान शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. अनेक वर्षापासून विविध गुंतागुंत, गुन्हे, तुरुंगवास प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही लोकांना मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी खूप मोलाची मदत केली. शक्य नसताना काहींना नगरसेवक, आमदारकीच्या उमेदवारीसाठी पक्षात विरोध असताना शक्ती पणाला लावून त्यांना उमेदवारी दिली. या मंडळींकडून शिंदे यांची साथ सोडणे शक्य नाही, असे ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले.

डोंबिवली, कल्याणमध्ये शिवसेनेत उध्दव, शिंदे समर्थक असे दोन तट पडल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा पुतळा डोंबिवलीत जाळला जात असताना त्याला प्रतिबंध करण्यासाठी एकही शिवसैनिक पुढे न आल्याने राऊत यांच्या बडबडीविषयी दोन्ही गटात प्रचंड नाराजी असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले. राऊत यांचा शिलेदार मानला जाणारा डोंबिवलीतील एक सच्चा शिवसैनिकही काल गायब होता, अशी चर्चा आहे.

शिंदे यांच्या तसबिरी गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखेत दर्शनी भागात उध्दव ठाकरे यांच्या सोबत बंडखोर एकनाथ शिंदे, डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तबसिबीरी होत्या. या तसबिरी सेनेच्या महिला आघाडीने काढून टाकल्या. ही माहिती मिळताच शिंदे समर्थक शाखेत आले. त्यांना शाखेच्या प्रवेशव्दारावर अडविण्यात आले. यावरुन शिंदे, समर्थक गटात बाचाबाची झाली. धक्काबुक्कीपर्यंत प्रकार गेल्याचे कळते. उध्दव समर्थकांचा हा प्रकार पाहून शिंदे समर्थकांनी शाखेचा ताबा घेण्याची तयारी केली. ही माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी शाखेभोवती बंदोबस्त वाढविला. शाखेचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरच रोखून परत पाठविले. त्यामुळे मध्यवर्ति शाखेवर आता उध्दव समर्थकाचा कब्जा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कार्यालयात खा. शिंदे यांचे कार्यालय आहे.