ठाणे – मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे धोरण राज्य शासनाकडून आखले जात असून यामुळे येथील रहिवाशांचे लवकरच कायमस्वरुपी पुनर्वसन होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात पक्ष प्रवेश कार्यक्रमादरम्यान बोलताना दिली. या कार्यक्रमात उबाठाचे दोन माजी नगरसेवक तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या एका नगरसेविका अशा तिघांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईतील उबाठाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात बोलताना विजेंद्र शिंदे यांनी प्रभागातील दोन समस्या मांडत त्या सोडविण्याची मागणी केली. प्रभागात दरड कोसळून अपघात होऊ नयेत यासाठी त्या भागात जाळ्या बसविण्याची मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर जलकुंभाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली परवानगी देण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
मुंबईतील दरड प्रवण क्षेत्रात कोणताही अपघात घडू नये यासाठी त्या भागात जाळ्या बसविण्यात येतील. त्याचबरोबर संपुर्ण मुंबईतील दरड प्रवण क्षेत्रातील रहिवाशांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे धोरण राज्य शासनाकडून आखले जात असून या धोरणामुळे रहिवाशांचे कायमस्वरुपी पुनर्वसन होईल, असे शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई शहरातील रस्ते काँक्रीट करण्याचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. यातील एका टप्प्याचे काम पुर्ण होत आले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पुर्ण झाल्यानंतर मुंबई खड्डेमुक्त होईल, असे सांगत इतके वर्षे हे का झाले नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्री असताना वैद्यकीय साहाय्यता निधीमधून ४०० कोटी रुपये रुग्ण उपचारासाठी दिले. तर, महाविकास आघाडीच्या काळातील मुख्यमंत्र्यांनी केवळ अडीच कोटी रुपये वैद्यकीय साहाय्यता निधीचे रुग्णांना वाटप केले, अशी टिकाही त्यांनी केली.
पक्ष प्रवेशाचे सत्र सुरुच
मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक अजीत भंडारी, विजेंद्र शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची माजी नगरसेविका नादीया शेख यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे, अजीत भंडारी आणि विजेंद्र शिंदे हे दोघेही बुधवारी मातोश्रीवर झालेले उबाठाच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय, गोव्यातील उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.