ठाणे : दोन ठाकरे एकत्र आले तर टिकऱ्या होतील असे ते म्हणतात. पण घोडा मैदान जवळ आहे टिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल. कारण जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर ठाम राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील. त्यांनी आनंद दिघे यांचा अपमान केलेला आहे. आनंद दिघे यांना कमी लेखत आहे. बाळासाहेब साहेब आमच्या हृदयात आहेत आणि आनंद दिघे आमच्या रक्तात आहेत. ज्यांनी शिवसेना विकली, त्यांना जनता टिकली देईल अशी टीका राज्याचे उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
ठाण्यातील कोपरी भागातील अष्टविनायक चौक येथे शनिवारी ‘दिवाळी पूर्वसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दोन ठाकरे एकत्र आले तर टिकऱ्या होतील असे ते म्हणतात, पण घोडा मैदान जवळ आहे. टिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल. कारण जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर ठाम राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील. त्यांनी आनंद दिघे यांचा अपमान केलेला आहे. आनंद दिघे यांना कमी लेखत आहे. बाळासाहेब साहेब आमच्या हृदयात आहेत आणि आनंद दिघे आमच्या रक्तात आहेत असे शिंदे म्हणाले.
महायुतीचाच भगवा फडकेल
शिंदे पुढे म्हणाले की, काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात. पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात. त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहते. आम्ही वर्षभर लोकांच्या दारात जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महायुतीचाच भगवा फडकेल.
यांच्या हातात जनता टिकली देईल
महाराष्ट्रामध्ये किती काही लोकांनी केले, किती एकत्र आले, काही म्हटले, टिकऱ्या उडतील. परंतु लोक त्यांच्या हातामध्ये टिकल्या देतील. महायुती लोकसभेमध्ये जिंकली आहे, विधानसभेमध्ये जिंकली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकेल. ज्यांनी शिवसेना विकली आता त्यांच्या हातात लोक टिकली देतील.आमचा एकच ॲटम बाँब विरोधकांचे काम तमाम असेही शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या सोबत
दिवाळीत काही ठिकाणी आनंद आहे. परंतु पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकारने केले आहे. शेतकरी संकटातून सावरत आहे. दिवाळीत त्यांच्या आयुष्यातील संकट दूर होऊदे असे एकनाथ शिंदे म्हणाले. दिवाळीत महापालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षापेक्षा बोनसमध्ये थोडी वाढ दिलेली आहे. त्यामुळे सर्व महापालिका कर्मचारी खुश आहेत. पहिल्यांदा एसटीचा संप पहिल्यांदा झाला नाही. २० वर्षामध्ये पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांचा संप न होता १०७ कोटी रुपये कर्मचाऱ्यांसाठी दिले. त्यामुळे एसटीचे एक लाख कर्मचारी देखील आनंदात आहे असा दावाही त्यांनी केला.