ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी नेत्यांची यादी आज, बुधवारी सायंकाळी उशीरा जाहीर केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंंदे यांचे कडवे विरोधक वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.
विशेष म्हणजे, नवी मुंबईतील नाईकांच्या बालेकिल्ल्यात त्यांचे माजी खासदार पुत्र संजीव यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकांमध्ये ठाणे जिल्ह्यात भाजपने शिंदे यांच्या विरोधात आक्रमक पावले उचलल्याचे संकेत मिळू लागले आहे.
राज्यासह ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणूका येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापैकी नगरपालिका निवडणूकांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. या निवडणूका तोंडावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा निवडणूक प्रमुख व जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी सांयकाळी केली. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात विभागांची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यामध्ये ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मिरा भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर या विभागांचा सामावेश आहे.
नाईक यांच्यावर ही जबाबदारी सोपवित असताना प्रदेशाध्यक्षांनी प्रत्येक विभागासाठी काही निवडणूक प्रमुखही निश्चित केले आहेत. यामध्ये ठाणे शहर- आमदार संजय केळकर, ठाणे ग्रामीण- माजी खासदार कपिल पाटील, भिवंडी- आमदार महेश चौघुले, मिरा भाईंदर – आमदार नरेंद्र मेहता, नवी मुंबई – माजी खासदार संजीव नाईक, कल्याण- नाना सुर्यंवशी, उल्हासनगर- प्रदीप रामचंदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई-विरार आणि पालघर भागासाठी आमदार राजन नाईक आणि बाबाजी काठोळे यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद सोपविण्यात आले आहे. तर रायगड उत्तर आणि रायगड दक्षिणची जबाबदारी अनुक्रमे रामशेठ ठाकूर आणि सतीश धारप यांना देण्यात आली आहे.
शिंदे यांना पुन्हा नाईकांचे आव्हान
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढावी या मताचे नाईक आहेत. पक्षाने मला संधी दिली तर ठाण्यात देखील ‘कमळ’ उगवून दाखवेल, असे वक्तव्य नाईक यांनी मध्यंतरी केले होते. या पार्श्वभूमीवर नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारीपद सोपवून भाजपने शिंदे यांनाच एकप्रकारे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली आहे.
नवी मुंबईतही भाजपमध्ये नाईक विरुद्ध आमदार मंदा म्हात्रे असा सामना रंगलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे निवडणूक प्रमुखपद संजीव नाईक यांच्याकडे सोपवून भाजपने तेथेही शिंदे सेनेशी दोन हात करण्याची तयारी दाखविल्याचे चित्र आहे.
दरम्यान, भाजपच्या निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखपदाची यादी पाहिली तर राज्यभर खासदार, आमदार आणि मंत्र्यांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाण्याची जबाबदारी गणेश नाईक यांना दिली म्हणजे एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले असे म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.
