Eknath shinde : ठाणे मुख्यमंत्रीपद येताच गणेशोत्सवाच्या माध्यामातून कोकण परिसरात अधिकाधिक संख्येने एसटी गाड्या सोडून ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील कोकणवासीयांवर आपली छाप सोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदाही या प्रवासावर आपल्या पक्षाचे वर्चस्व राहील याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. वर्तकनगर, चरई, खोपट, लोकमान्य नगर, बाळकूम, डोंबिवली, कल्याण अशा विविध भागातून मोठ्या संख्येने असलेल्या कोकणवासीयांना मोफत बससेवा उपलब्ध व्हावी यासाठी शिंदे यांच्या समर्थकांनी २ हजारहून अधिक एसटी गाड्यांची नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार, २५ ऑगस्ट पासून या बस कोकणवासियांना घेऊन कोकणात जाण्यास रवाना होणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी उल्हासनग, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठ्यासंख्येने कोकणवासी नागरिक नोकरी आणि व्यवसायनिमित्त राहतात. गणेशोत्सव असो वा शिमगोत्सव हे कोकणवासी आपल्या मुळ गावी जाऊन सण साजरा करण्यास प्राधान्य देतात. विशेष करुन गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. या कोकणवासियांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि आनंदी व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनासह एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्यांचे नियोजन केले जाते. तर, या कोकणवासी नागरिकांवर छाप पाडण्यासाठी काही राजकीय मंडळींकडून मोफत एसटी गाड्या उपलब्ध करुन दिल्या जातात. सण-उत्सवाच्या काळात अधिकाधिक संख्येने एसटी गाड्या सोडून ठाणे जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेशातील कोकणवासीयांना आकर्षित करण्याचे काम हे राजकीय मंडळी करताना दिसतात. यंदाच्या वर्षी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन गणेशोत्सवाच्या महिनाभर आधिपासून ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण या शहरांमध्ये काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून ‘कोकणवासीयांसाठी मोफत एसटी सेवा’ यासाठी अर्जाचे आवाहन करणारे बॅनर लावण्यात आले होते. तर, काहीजण व्हॉटस ॲप च्या माध्यमातून गुगल फॉर्म भरुन घेत होते.कोकण परिसरात अधिकाधिक संख्येने एसटी गाड्या सोडून ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबई महानगर प्रदेशातील कोकणवासीयांवर आपली छाप सोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदाही या प्रवासावर आपल्या पक्षाचे वर्चस्व ठेवल्याचे दिसत आहे. या पक्षाकडून एसटी सर्वाधिक गाड्यांची नोंदणी झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. खेड, महाड, पाली, माणगाव, चिपळूण, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, दापोली सिंधुदूर्गसह, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या प्रमुख ठिकाणी या बस सोडण्यात येणार आहेत.

असे आहे बसचे नियोजन

ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी, मुलुंड आणि भांडूप या प्रमुख शहरातून २ हजार ३०२ एसटी गाड्यांची समूह नोंदणी झाली आहे. राजकीय मंडळी किंवा विशिष्ट संस्थेच्यामार्फत ही नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच सोमवार, २५ ऑगस्टपासून या मोफत एसटी गाड्या ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून सोडण्यात येणार आहेत. कोकणवासियांकडून प्राप्त झालेल्या अर्जांनुसार प्रत्येक भागात या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एका गाडीत ४० प्रवासी प्रवास करु शकतात.

कुठून बस सोडल्या जाणार?

ठाणे शहरातील लोकमान्य नगर परिसरात शिवसेना (शिंदे गट) मध्यवर्ती शाखा तसेच काही माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून मोफत एसटी बस सोडल्या जात आहेत. त्यातील लक्ष्मीपार्क येथील सर्व्हिसरोड परिसरातून सोमवार, २५ ऑगस्ट रोजी २८ बस सोडल्या जाणार असून यातून १ हजार १२० प्रवासी कोकणात रवाना होणार आहेत, अशी माहिती शिवसेना (शिंदे गट) मध्यवर्ती शाखेच्यामार्फत देण्यात आली. तर, याच दिवशी लोकमान्य नगर येथील टीएमटी डेपोतून काही माजी नगरसेवक जे की आता शिंदे गटात आहेत, त्यांच्यामार्फत काही एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत. यासह, ठाणे शहरातील किसनगर, रामचंद्र नगर, ज्ञानेश्वर नगर, सावरकर नगर, खोपट, बाळकूम, कोपरी अशा विविध भागातून देखील एसटी गाड्या सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.