Nepal Protests / ठाणे : नेपाळमध्ये ‘जेन-झी’ने सरकारविरोधात केलेल्या निदर्शनांंनी उग्र स्वरुप धारण केले आहे. भारतातून हजारो यात्रेकरू कैलास मानसरोवर येथे गेल्याने आता ते तिबेट आणि नेपाळच्या हिल्सा सीमेवर अडकले आहेत. या यात्रेकरूंशी संपर्क साधला असता, ते सुरक्षित असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पथक आमच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
नेपाळमध्ये ‘जेन-झी’ने सरकारविरोधात सोमवारी सुरु केलेल्या निदर्शनांनी मंगळवारी अधिकच उग्र स्वरुप धारण केले. नेपाळमध्ये जाळपोळ सुरु झाली असून नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला. नेपाळमधील गंभीर स्थितीचा परिणाम विमानसेवेवरही झाला आहे. भारतातून हजारो नागरिक नेपाळमध्ये पर्यटन आणि कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आहेत. त्यामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. राज्यासह मुंबई, ठाण्यातील शेकडो नागरिक नेपाळ, चीन-नेपाळ येथील सीमेवर अडकले आहेत. या सर्वांना भारतात केव्हा परतणार याची चिंता सतावत आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे राहणारे ४४ वर्षीय चिराग भुवा यांनी सांगितले की, आम्ही एका ग्रुप टूरने कैलास मानसरोवर यात्रेवर निघालो होते. आमच्या ग्रुपमध्ये वयोवृद्धांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. नेपाळमधील हिंसक आंदोलनांमुळे तिबेटच्या बुरांग काउंटी आणि नेपाळच्या हिल्सा सीमेवर अनेक यात्रेकरू अडकले आहेत. या यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचा समावेश असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या टीमकडून महत्त्वाची मदत मिळत आहे.
१० सप्टेंबरला परण्याचे नियोजन पण…
५ सप्टेंबर रोजी लखनौहून यात्रेला सुरुवात केलेल्या यात्रेकरूंनी नेपाळगंज, नंतर विमानाने सिमिकोट आणि तेथून हेलिकॉप्टरने हिल्सा असा प्रवास करत तिबेटमध्ये प्रवेश केला. ९ सप्टेंबर रोजी त्यांनी दर्शन पूर्ण केले. मात्र, १० सप्टेंबरला परत येण्याचा त्यांचा कार्यक्रम नेपाळमधील व्यापक दंगली आणि राजकीय अस्थिरतेमुळे विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
नेपाळमार्गे भारतात परतण्याचा नियमित मार्ग सध्या बंद असल्याने यात्रेकरू हिल्सा सीमेवर परतण्याची संधी शोधत आहेत. या कठीण परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीमने पुढाकार घेत यात्रेकरूंना आवश्यक मदत उपलब्ध करून दिली आहे.
सुरक्षित परतीसाठी प्रयत्न करत असतानाच या टीमने यात्रेकरूंना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत मिळेल याची हमी दिल्याचेही ते म्हणाले. काठमांडूमधील भारतीय दूतावास काठमांडू आणि बीजींगमधील भारतीय दूतावास हे देखील आमच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या टीमच्या मदतीने यात्रेकरू ११ सप्टेंबर रोजी नेपाळमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहेत असेही ते म्हणाले.