दिवा, शीळ, डायघरच्या वस्त्यांमध्ये अघोषित भारनियमन

‘नवीन ठाणे’, ‘नवीन घोडबंदर’ अशी जाहिरात करून दिवा, शीळ, डायघर तसेच २७ गावांलगत मोठमोठी गृहसंकुले आणि इमारती उभारण्याचा सपाटा बांधकाम व्यावसायिकांनी चालवला असला तरी, या ठिकाणी राहावयास आलेल्या नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी धावाधाव करावी लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून या भागांत वीजपुरवठा वारंवार खंडित होऊ लागला असून अनेक भागांत चार-पाच तास वीज गायब होत आहे. त्यामुळे येथील रहिवासी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्याने मुंब््रयाचा फटका आसपासच्या नव्याने विकसित होत असलेल्या रहिवाशी वसाहतींनाही बसू लागला आहे. जेथे वीजचोरीचे प्रमाण अधिक तेथे भारनियमनही वाढीव, असे वीज वितरण कंपनीचे जुने सूत्र राहिले आहे. मुंब्रा विभाग क्षेत्रात हे प्रमाण सर्वाधिक असल्याने यालगत उभ्या राहाणाऱ्या नव्या वसाहतींनाही उन्हाळ्याच्या काळात याचा फटका बसतो. असे असताना पावसाळा सुरू होताच येथील वीज वितरण व्यवस्थेचे अक्षरश: तीनतेरा वाजल्याने उन्हाळाच बरा होता, अशी म्हणण्याची वेळ येथील रहिवाशांवर येऊन ठेपली आहे. वीज बंद करताना नागरिकांना पूर्वसूचना न देणे, वीजपुरवठा तासन्तास बंद ठेवणे, वीजपुरवठा करण्याचे योग्य वेळापत्रक नसले तरी अवाजवी बिल आकारणे यांसारख्या समस्या या मुंब्रापल्याडच्या रहिवाशी वसाहतींमधील नागरिकांसाठी नेहमीच्याच झालेल्या आहेत.

दिवा शहरातील आगासन, साबे गाव, दातवली, म्हातार्डी आणि मुंब्रा-डायघर येथे अनधिकृत बांधकामांचा व्यावसायिकांनी चंगच बांधला आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी बांधकामात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. एकीकडे दिवा, मुंब्रा या शहरांत इमारतींचे इमले बांधले जात असले तरी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून वीजपुरवठय़ाचे नियोजन प्रशासनाला करता आलेले नाही. शहरात मोठय़ा प्रमाणावर वीजचोरी होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. मात्र, त्यावर उपाय करण्यात आलेला नाही. त्यातच अवाजवी वीज बिले पाठवण्यात येत असल्याने थकबाकीदारांची संख्या वाढत आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या नेहमीचीच झाली आहे. या शहरात वीजचोरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. याबद्दल महावितरण व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारी केल्या जातात; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.  वीजवाहिनीला कोणतीही सुरक्षा नसल्याने पावसाचे पाणी त्या वाहिन्यांमध्ये शिरते. त्यामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे विजय भोईर यांनी सांगितले.

वीज व्यवस्थेचे तीनतेरा

या भागात रस्त्यावरील वीजवाहिन्या उघडय़ावरच असल्याने कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही. वीजवाहिन्यांमध्ये पाणी जाऊन शॉर्टसर्किट होण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. शॉर्टसर्किट, झाडे उन्मळून पडणे, तांत्रिक बिघाड होणे यांसारख्या अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे महावितरण मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

वीज जाण्याची समस्या फक्त मुंब्रा व दिवा या परिसरांतच नाही, तर संपूर्ण ठाणे शहराला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेसचे सरकार असताना सातत्याने प्रयत्न करून भारनियमन आणि वीज जाण्याच्या प्रमाणावर र्निबध घातले होते. सध्या या समस्येकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने हे प्रमाण अधिक वाढले आहे.

जीतेंद्र आव्हाड, आमदार 

झाड पडणे, तांत्रिक अडचणी, पावसामुळे होणारे शॉर्टसर्किट यामुळे या शहरांमध्ये वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण मंडळ प्रयत्नशील आहे. तसेच अनधिकृत वीजजोडणी घेणाऱ्यांची तक्रार जागृत ग्राहकांनी मुख्य अभियंता, भांडुप नागरी परिमंडळ ०२२-२५६६०६५२ किंवा अधीक्षक अभियंता ठाणे, ०२२-२५८३२८९१ तसेच भारतगिअर कक्ष ७५०६६५८०४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

विश्वजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, भांडुप परिमंडळ