Employee Investment Scam: डोंबिवली – डोंबिवलीतील दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन नोकरदारांची शेअर गुंतवणूक, व्यवसायातील भागीदारीच्या माध्यमातून एकूण ६९ लाख ३६ हजार १०० रूपयांची तीन जणांनी फसवणूक केली आहे. ऑनलाईन गुंतवणुकीतील लाखो, कोट्यवधी रूपयांच्या या दाखल गुन्ह्यांचा तपास कसा करायचा असा प्रश्न पोलिसांना सतावत आहे. फसवणूक करणारे इसम हे बाहेरच्या प्रांतामधील आणि ते आपले मोबाईल सीमकार्ड सतत बदलत असल्याने त्यांचा माग काढणे पोलिसांना अवघड होत आहे.
डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात प्रतिक पदीप ठाकरे (३४) हे नोकरदार राहतात. त्यांची व्यवसायात भागीदार करून घेतो असे सांगून दोन जणांनी फसवणूक केली आहे. फसवणूक करणारे दोघे गणेशनगर भागात राहतात. ठाकरे यांची ३७ लाख ३६ हजाराची फसवणूक झाली आहे. ठाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आशीष आनंद पवार (४०), आनंद रामचंद्र पवार (६१) यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोघे गणेशनगर मधील पांडुरंग टाॅवरमध्ये राहतात. डिसेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर मधील भोलेनाथ कृपा इमारतीत घडला आहे.
प्रतिक ठाकरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गुन्हा दाखल इसम आशीष पवार आणि आनंद पवार यांनी आपणास सांगितले की आपला उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदरात उतरविण्यात येणारा विविध प्रकारचा माल वाहनातून मागणी केलेल्या नोंदणीधारकांकडे वाहनाने पोहचविण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायात चांगली कमाई आहे. त्यामुळे या व्यवसायात आम्ही तुम्हाला भागीदार म्हणून घेऊ शकतो. या व्यवसायातील भागीदारीसाठी पवारांनी प्रतिक ठाकरे यांच्याकडून ३७ लाख ३६ हजार रूपये उकळले. त्यानंतर व्यवसायातील भागीदारी नाहीच पण दिलेल्या रकमेचा अपहार केला म्हणून ठाकरे यांनी फसवणुकीची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस अधिकारी प्रशांत मोरे तपास करत आहेत.
दुसऱ्या एका फसवणूक प्रकरणात, शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन सिटीमध्ये राहत असलेल्या एका ५४ वर्षाच्या नोकरदाराची शेअर गुंतवणूक, आयपीओ खरेदीच्या माध्यमातून आणि वाढीव नफ्याच्या आमिषाने ऑनलाईन उपयोजनातून गेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत एका इसमाने ३२ लाख रूपये उकळले. या रकमेवर ५२ लाखाचा नफा दाखविण्यात आला. नफ्याची रक्कम तक्रारदाराने काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना २४ लाख, १२ लाख रुपये भरण्याच्या सूचना करण्यात आला. गुंतवणूक रकमेवर नफा वाढत होता. तो काढण्यास गेले की तक्रारदाराला रक्कम भरण्याची सूचना केली जात होती.
आपल्या जवळ पैसे शिल्लक नाहीत सांगुनही गुंतवणूक सल्लागार ऐकण्यास तयार नव्हते. आपण रक्कम भरणा केली नाहीतर आपली रक्कम बुडित खात्यात जमा होईल, अशा सूचना सल्लागार करत होते. तक्रारदाराच्या मुलीने गुंतवणूक उपयोजनची चौकशी केली तेव्हा ते बनावट, दगलबाज असल्याचे उघड झाले. आपली ३२ लाखाची रक्कम भामट्यांनी लाटली असल्याचे समजल्यावर गुंतवणूकदाराने मानपाडा पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेत तक्रार केली आहे. मागील दोन वर्षात कल्याण, डोंंबिवली परिसरातून गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना भामट्यांनी गंडा घातला आहे.