डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण दिशेकडील सरकता जिना मंगळवारी कोणत्याही उद्घाटन प्रक्रियेचा घाट न घालता रेल्वे प्रशासनाने सुरू केला. गेल्या दीड वर्षापासून या सरकत्या जिन्याची कामे सुरू होती. त्यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन जिना आणि स्कायवाॅकवर जावे लागत होते.

सरकता जिना सुरू होताच लोकलमधून उतरलेल्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. आता वळसा घेऊन न जाता उतरल्यानंतर जागीच स्कायवाॅकवर जाण्यासाठी प्रवाशांना जिना उपलब्ध होणार आहे. या सरकत्या जिन्याच्या गेल्या दीड वर्ष रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होणारा त्रास याविषयी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत हे विषय मांडले होते.

डोंबिवली हे मध्य रेल्वेच्या स्थानकावरील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकात प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीन आणि चारवर कल्याण दिशेकडील पादचारी जिन्याच्या ठिकाणी सरकता जिना उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. दीड वर्षापूर्वी प्रवाशांना कल्याण बाजूकडील पादचारी जिना बंद करण्यात आला. हा जिना काढून टाकण्यात आल्यानंतर तीन महिन्यात सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होईल असे रेल्वेचे नियोजन होते.

पण, या कामात अनेक तांत्रिक अडथळे आले. त्यामुळे सरकता जिना उभारणीला तब्बल दीड वर्ष लागले. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरून मुंबईला जाणाऱ्या आणि कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल धावतात. डोंबिवली रेल्वे स्थानकात या दोन्ही फलाटांवर लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांना कल्याण बाजूकडील जिने सरकत्या जिन्याच्या कामासाठी तोडून ठेवण्यात आल्याने वळसा घेऊन मग पादचारी जिन्यावरून जावे लागत होते.

एकाचवेळी कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल आणि मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल फलाटावर आल्या की प्रवाशांची जिन्याच्या दिशेने जाताना घुसमट होत होती. त्यामुळे प्रवासी सरकत्या जिन्याचे काम लवकर पूर्ण करा अशी मागणी करत होते. सरकत्या जिन्याचे पायाभरणीचे काम सुरू झाल्यानंतर ते नंतर रखडले. सरकत्या जिन्यासाठी लागणारी रस्ते मार्गाने आणलेली यंत्रणा फलाटावर घेण्यासाठी रात्रीच्या वेळेत मध्य रेल्वेकडून ब्लाॅक मिळणे गरजेचे होते. हा ब्लाॅक मिळत नसल्याने सहा ते सात मिळण्याचा अवधी गेला. ब्लाॅक मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाजुला आणून ठेवण्यात आलेली यंत्र सामग्री फलाटावर घेण्यात आली.

सरकत्या जिन्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून गतीने सुरू होते. यांत्रिक, तांत्रिक आवश्यक चाचण्या पूर्ण केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरकता जिना सुरू करण्यात आला. या जिन्यामुळे वळशाचा त्रास वाचणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

(डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट तीन आणि चारवरील सरकता जिना सुरू.)