कोळंबीची खिचडी, चिंबोऱ्याचे कालवण आणि झणझणीत रस्सा
प्रत्येक समाजाची खाद्यसंस्कृती वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण असते. त्यामुळे पदार्थातील घटक सारखेच असले तरी प्रदेश, समाज, ठिकाण, बनवणाऱ्याचे कसब यांमुळे पदार्थाची चव बदलत जाते. अशाच वैशिष्टय़पूर्ण खाद्यसंस्कृतीत ‘सीकेपी’ भोजनाचा समावेश हमखास होतोच. कोळंबीची खिचडी, चिंबोऱ्याचे कालवण, वालाचे बिरडे असे अनेक खास खाद्यपदार्थ हे सीकेपी खाद्यसंस्कृतीचे अंग आहेत. याच पदार्थावर ताव मारायचा असेल तर ठाण्यातील खारकर आळीतील सीकेपी सभागृहाला जरूर भेट द्या. याठिकाणी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज संस्थेतर्फे या आठवडय़ात सीकेपी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोलंबीची खिचडी, चिंबोऱ्याचे कालवण, वालाचे बिरडे, खाज्याच्या करंज्या, तेलपोळी, झणझणीत मच्छीचा रस्सा-भाकरी, भाजाणीचे वडे-मटण, तळलेले पापलेट, सुरमई, जिताडे आदींची चव चाखता येईल. १५ ते १७ जानेवारीदरम्यान हा महोत्सव भरविला जाणार असून त्याच्या उद्घाटनाला सुप्रसिद्ध गायक स्वप्निल बांडोदकर, ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. १५ व १७ जानेवारीदरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत, तर १६ जानेवारी रोजी शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत खवय्यांना या महोत्सवात भाग घेता येईल.
कधी- १५ ते १७ जानेवारी
कुठे- सीकेपी सभागृह, खारकर आळी, ठाणे (प.)
घावन, आंबोळय़ा आणि सुकी मच्छी
भरलेली पापलेट, जवळा आणि तांदळाची भाकरी, भरलेली चिंबोरी, तळलेल्या माखल्या, गाभोळीचे भरीत, भाजलेली कोंबडी अशी लज्जतदार मांसाहाराची पंगत सध्या डोंबिवलीत मांडण्यात आली आहे. लोकसेवा समिती डोंबिवली या सामाजिक संस्थेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १४ ते १७ जानेवारी या काळात अरुणोदय सोसायटी मैदान, भोईरवाडी, महात्मा फुले रोड, डोंबिवली (प) येथे भव्य कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लेझीम स्पर्धा, गोफनृत्य, रेल्वे प्रवासी संगीत भजन स्पर्धा, दशावतार, महिला संगीत भजन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम या बरोबरच गुणवंत मुलांचा गौरव, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कोकणातील विविध उत्पादनांचे स्टॉल्स मांडण्यात येणार असून घावन, आंबोळ्या, सुकी मच्छी, कुरल्यांचे सांभार आणि कोंबडी-वडे हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. यावेळी सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच विविध वस्तूंचे प्रदर्शन येथे भरविण्यात येणार आहे. लोकनृत्याचा नजराणा खास डोंबिवलीकरांसाठी येथे आयोजित करण्यात आला आहे.
कधी- १४ ते १७ जानेवारी
कुठे- अरुणोदय सोसायटी मैदान, भोईरवाडी, महात्मा फुले रोड, डोंबिवली (प)
उत्सव साहित्याचा
रोटरीच्या वतीने साहित्य वाटिका हा साहित्य उत्सव डोंबिवलीत भरविण्यात येत आहे. १५ ते १७ जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले नाटय़गृह, निवासी विभाग, डोंबिवली (पू.) येथे हा कार्यक्रम होणार आहे. १५ जानेवारीला ग्रंथदिंडीने या साहित्य उत्सवाची सुरुवात होणार आहे. आंबेडकर हॉल ते सावित्रीबाई फुले नाटय़गृह दरम्यान दिंडी निघेल. त्यानंतर ११ ते १ निबंध स्पर्धा, दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत काव्यवाचन व कथाकथन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता उद्घाटन होणार असून लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यावेळी उपस्थित रहाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सात वाजता कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. १६ जानेवारीला सकाळी १० वाजता संत साहित्य या विषयावर डॉ. गो.बं.देगलुरकर, डॉ. भाग्यश्री पाटसकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी एक वाजता वाजता ‘प्रवासी साहित्य’ या विषयावर उमेश झिरपे, जयंत सहस्रबुद्धे, जगन्नाथ कुंटे यांचे चर्चासत्र होणार आहे. दुपारी ४ वाजता मराठी कविसंमेलन रंगणार असून यात रामदास फुटाणे, अशोक नायगांवकर, अरुण म्हात्रे आणि त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता संस्कृत संगीत नाटक होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता हिंदी हास्य कविसंमेलन होणार आहे. यात सुभाष काबरा, डॉ. मुकेश गौतम, सुमिता केशवा, नवनीत हुल्लड, प्रकाश पपलू हे सहभागी होणार आहेत. रविवार, १७ जानेवारीला सकाळी १० वाजता बालसाहित्य जत्रा होणार आहे. दुपारी २ वाजता अंधांचे कविसंमेलन होईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्त्री साहित्य या विषयावर डॉ. अरुणा ढेरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. अभिराम दीक्षित व गणेश पंडित हे ब्लॉग्ज या विषयावरील माहिती देतील. सायंकाळी ७ वाजता स्थानिक गुणवंत कवींचे संमेलन होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
कधी- १५ ते १७ जानेवारी, वेळ : सकाळी १० ते रात्री ८
कुठे- सावित्रीबाई फुले नाटय़गृह, निवासी विभाग, डोंबिवली (पू.)
गझल मुशायरा
गझल तुझी नि माझी या उपक्रमाच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त दर्जेदार गझलांच्या मुशायरांचा कार्यक्रम रविवार, १७ जानेवारी रोजी डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. शब्दांकित संस्थेचे प्रशांत वैद्य व त्यांच्या चमूतर्फे दर्जेदार गझला रसिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, म्हणून विविध भागात हा मुशायरांचा कार्यक्रम सादर केला जात आहे. या मुशायरात प्रशांत वैद्य, अनिल आठलेकर, मधुसूदन नानिवडेकर, विजय उतेकर, प्रथमेश तुगावकर, नि:शब्द देव सहभागी होणार आहेत.
कधी- रविवार, १७ जानेवारी, वेळ : सायंकाळी ६ वाजता
कुठे- सर्वेश सभागृह, डोंबिवली (पूर्व.)
बदलापुरात ‘अमर बन्सी’चे सूर
बदलापूरकर रसिकांना बासरीचे सुमधुर सूर ऐकण्याचा एक सुवर्ण योग चालून आला आहे. शहरात वर्षभर अभिनव कार्यक्रम राबविणाऱ्या ब्राह्मण समाज मंडळातर्फे ज्येष्ठ बासरीवादक अमर ओक यांच्या अमर बन्सी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने बासरीचे सूर नववर्षांत शहरात घुमणार आहेत. जागा मर्यादित असल्याने या कार्यक्रमासाठी रसिकांनी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- शमिंद्र कुलकर्णी- ९६१९८५०३३५
कधी- शनिवार, १६ जानेवारीला सायं. ६.३०
कुठे- जि.प. मराठी शाळेचे पटांगण, गांधी चौक, बदलापूर (पू.)
भूतानच्या संस्कृतीचे ‘फोटो’दर्शन
विविध ऐतिहासिक ठिकाणी सहलीला जाण्याची मजा आणि तिथल्या आठवणी कॅमेऱ्यात टिपण्याची मजा अनोखी आहे. भारत आणि भूतान यांच्या सीमेला टोटोपारा असे म्हणतात. या भागातील रहिवाशांचे भावविश्व छायाचित्रांच्या माध्यमातून पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. फोटो सर्कल सोसायटीतर्फे छायाचित्रकार अभिजीत अलका अनिल यांच्या शेडिंग लाइट्स ऑफ टोटोज ऑन टोटोपारा यावर आधारित ७२व्या छायाचित्र स्लाइड शोजचे आयोजन करण्यात आले आहे.
कधी – रविवार, १७ जानेवारी, वेळ – सायंकाळी ५.३० वाजता
कुठे – ठाणे कला भवन, कापूरबावडी नाका, ठाणे (प.)
शास्त्रीय संगीताची रसबरसात
हेमा उपासनी म्युझिकल अॅकॅडमीतर्फे शास्त्रीय संगीताची ‘रसबरसात’ मैफल आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीनिमित्त तालमहर्षी पं. सपन चौधरी, सुप्रसिद्ध सतार वादक पं. हबीब खान प्रथमच ठाण्यात आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर हेमा उपासनी यांचे गायन सादर होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर अभिषेकशिनकर व तबल्यावर मुकुंदराज देव साथसंगत करणार आहेत. शनिवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. संपर्क-९८१९५०६८००
कधी- शनिवार, १६ जानेवारी, वेळ : सायंकाळी ६ वाजता
कुठे- हेमा उपासनी म्युझिक अॅकॅडमी, तिसरा मजला, स्वप्नसृष्टी अपार्टमेंट, गुरुकुल रस्ता, पाचपाखाडी, ठाणे (प.)
‘हुई श्याम उन का खयाल आ गया’
ज्येष्ठ पाश्र्वगायक महम्मद रफी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज संगीतकारांकडे उत्तमोत्तम गाणी गायली. मात्र त्यातही लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांचे छान सूर जुळले. संगीत जगतात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या जोडीतील प्यारेलाल यांच्या उपस्थितीत महम्मद रफी यांच्या सदाबहार रचना ऐकण्याचा योग येत्या शनिवारी ठाण्यात जुळून आला आहे. ‘हुई श्याम उन का, खयाल आ गया’ या मैफलीत गायक श्रीकांत नारायण हे रफी यांची गाणी सादर करतील.
कधी- शनिवार, १६ जानेवारी, वेळ : रात्री ८.३०
कुठे– डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे (प.)