कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील सुमारे साडे चार लाख रूपये किमतीची मुदत संपलेली औषधे उंबर्डे येथील कचराभूमीवर विल्हेवाटीच्या प्रतीक्षेत मागील तीन महिन्यांपासून आहेत. हा मुदत संपलेल्या औषधांचा विषय चर्चेत असताना आता उल्हासनगर कॅम्प तीन येथील मध्यवर्ति शासकीय रुग्णालयात मुदत संपलेल्या माऊथ वाॅशचा वापर रुग्णालयातील शौचालय, स्वच्छतागृह, बेसीन स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून वापर केला जात असल्याच्या तक्रारी रुग्ण आणि नातेवाईकांकडून करण्यात येत आहेत.

महापालिका, शासकीय रुग्णालयांमधील औषध खरेदी, त्यांचा वापर आणि मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट या विषयावर नियंत्रक वैद्यकीय आरोग्य शासकीय यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असे प्रश्न आता रुग्ण, नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत. गेल्या जून महिन्यात कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयांमधील करोना महासाथ काळात आणि त्यानंतर खरेदी केलेल्या सुमारे साडे चार लाख रूपयांच्या औषधांची मुदत संपुनही वेळेवर पालिकेने त्याची विल्हेवाट लावली नाही. विहित प्रक्रियेने या औषधांची विल्हेवाट लावणे आवश्यक होते.

ही औषधे वरिष्ठ प्रशासनाला न कळविताच गुपचूप रात्रीच्या वेळेत कल्याण मधील उंबर्डे येथील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट कचराभूमीवर नेण्यात आली. विहित प्रक्रिया न करता या औषधांची गुपचूप विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघड होताच, आता हा विषय प्रशासनाची डोकेदुखी होऊन बसला आहे. विशेष मार्गदर्शक सूचना प्रणालीतून ही औषधे नष्ट करायची आहेत. पण सूचना प्रणाली अद्याप मंजूर होत नसल्याने कल्याण डोंबिवली पालिकेची मुदत संंपलेली औषधे कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्प कचराभूमीवर पडून आहेत.

आता हा विषय प्रलंबित असताना उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ति रुग्णालयात रुग्णांना सकाळच्या वेळेत मुख धुण्यासाठी देण्यात येणारे सुगंधित मुख स्वच्छ औषध (माऊथवाॅश) रुग्णालयातील शौचालय, स्वच्छता गृहात स्वच्छतेसाठी वापरले जात आहे. या माऊथ वाॅशची मुदत ऑगस्ट २०२५ मध्ये संपली आहे. ही माऊथवाॅश औषधे सप्टेंबर २०२३ मध्ये उत्पादन कंपनीने उत्पादित केली आहेत. एका माऊथवाॅश बाटलीची किंमत १२९ रूपये ५५ पैसे आहे. या माऊथवाॅश औषधांचे दोन ते तीन खोके मध्यवर्ति रुग्णालयाच्या रुग्णालय कक्ष क्रमांक १२ मध्ये पडून आहेत. या माऊथवाॅशची मुदत संपली असल्यामुळे ही औषधे आता रुग्णालयातील स्वच्छतागृहात स्वच्छतेसाठी वापरली जात आहेत, अशा तक्रारी काही रुग्ण, नातेवाईकांनी केल्या.

रुग्णालयातील कोणतेही औषध, वस्तूची मुदत संपल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची एक प्रक्रिया आहे. मग मध्यवर्ति रुग्णालयातील माऊथ वाॅश रुग्णालयातील कर्मचारी स्वच्छता गृहात कशी काय वापरू शकतात. माऊथ वाॅशची रुग्ण संख्यप्रमाणे पुरवठादाराकडून खरेदी करण्यात आली होती. की माऊथ वाॅशचा वाढीव साठा खरेदी करण्यात आला होता, असे प्रश्न आता या क्षेत्रातील जाणत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. अधिक माहितीसाठी मध्यवर्ति रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मनोहर बनसोडे यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी संंपर्काला प्रतिसाद दिला नाही.