ठाणे – ठाणे शहरातील वर्तकनगरजवळ असलेल्या एका भल्ल्यामोठ्या गृहसंकुलातील इमारतीत सोमवारी आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. १८ मजली इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील एका रुममध्ये ही आग लागल्यामुळे गृहसंकुलात भितीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे इमारतीत आणि इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाल्याचे चित्र होते. सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवित हानी झाली नाही.

वर्तकनगर हा ठाणे शहरातील एक महत्त्वाचा आणि गजबजलेला परिसर आहे. या परिसराला जोडून शिवाईनगर हा उपविभाग आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात अनेक उच्च मजली निवासी इमारती आणि सहकारी गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यासह, मोठ्यासंख्येने शैक्षणिक संस्था, रुग्णालय आणि मुख्य म्हणजे बाजारपेठ असलेला हा परिसर आहे. या परिसरात नागरी वस्ती मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे हा परिसर दिवस-रात्र गजबजलेला पाहायला मिळतो.

वर्तकनगर परिसरालगतच शिवाईनगर परिसर आहे. या शिवाईनगर परिसरात लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी हे भल्लेमोठे आणि प्रसिद्ध असे गृहसंकूल आहे. या गृहसंकुलात तळ १८ मजली इमारती आहेत. या गृहसंकुलातील डी विंग इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील विष्णू पालेकर यांच्या रुममध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे गृहसंकुलात भितीचे वातावरण पसरले. सर्व रहिवाशांमध्ये नेमकी ही आग कशी लागली याची चर्चा रंगली. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात देखील या आगीमुळे एकच खळबळ उडाली होती. परंतू, काही काळानंतर समजले की, ही आग स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक चिमणीला लागली आहे. ही आग लागली त्यावेळी घरात दोन व्यक्ती उपस्थित होते.

परंतू, आग लागल्याचे दिसताच ते दोघेही घराच्या बाहेर पडले. या घटनेची माहिती इमारतीतील एका रहिवाशाने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. घटनेची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी तसेच ठाणे अग्निशमन दलाचे जवान दोन अग्निशमन वाहन आणि एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही आग इमारतीतील सुरक्षा रक्षकांच्या सहकार्य़ाने ६ वाजून ०९ मिनिटांनी पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, किचन चिमणी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही,सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, घटनेचा पुढील तपास अधिकृत यंत्रणांकडून सुरू आहे. अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.