ठाणे : दिवा येथील खर्डीगाव भागात उन्नत विद्युत वाहिनीमध्ये अडकलेल्या कबुतरची सुटका करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. उत्सव पाटील (२८) असे मृत जवानाचे नाव असून जवान आझाद पाटील (२९) यामध्ये जखमी झाले.
खर्डीगाव येथील दिवा-शीळ मार्गालगतच्या टोरंट कंपनीच्या उन्नत विद्युत वाहिनीवर एक कबुतर अडकले होते. या बाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर दिवा येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवान उत्सव पाटील आणि आझाद पाटील हे कबुतरची सुटका करत असताना अचानक त्यांना विजेचा झटका बसला. दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील रुग्णालयात माहिती घेण्यासाठी गेले होते. या घटनेत उत्सव पाटील यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. तर आझाद पाटील यांच्या हाताला आणि छातीला भाजले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.