दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त बसगाडय़ांचे आरक्षण; एसटी महामंडळालाही आर्थिक दिलासा

आकांक्षा मोहिते
ठाणे : करोनामुळे गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने कोकणात जाणाऱ्यांचा ओघ वाढला आहे. यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातून ८३३ बसगाडय़ांचे आरक्षण झाले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ३३ बसगाडय़ांचे जास्त आरक्षण झाले आहे. करोना काळात कोकणवासीयांनी दिलेल्या प्रतिसादामुळे राज्य परिवहन महामंडळालाही आर्थिक दिलासा मिळाला आहे.

गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे तसेच उपनगरातील अनेक कोकणवासीय गावची वाट धरत असतात. दरवर्षी या कालावधीत रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाकडून कोकणात जाण्यासाठी विशेष गाडय़ा सोडण्यात येतात. या गाडय़ांच्या आरक्षणासाठी एक ते दोन महिने आधीपासूनच नोंदणी केली जाते. मागील वर्षी करोना संसर्गामुळे कोकणात जाण्यासाठी करोना चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या होत्या. तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही ५० टक्के क्षमतेने सुरू होती. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. गेल्या वर्षी ठाणे विभागातून कोकणात जाण्यासाठी केवळ २१८ विशेष बस गाडय़ा सोडण्यात आल्या. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट झाली होती. करोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे एसटी महामंडळाने राज्यभरातून २२०० विशेष बस गाडय़ांचे नियोजन केले असून त्यापैकी ठाणे विभागातून ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीसाठी ८०० विशेष बस गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या बस गाडय़ांच्या आरक्षण नोंदणीला १६ जुलैपासून सुरुवात झाली. ठाणे, मुलुंड, भांडुप, बोरिवली, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडी या ठाणे विभागातील आगारांतून चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, रत्नागिरी, साखरपा, लांजा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत.

ठाणे विभागातून नियोजित केलेल्या ८०० विशेष बसगाडय़ांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तरीही कोकणात जाण्यासाठी आणखी बसगाडय़ा सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. ही मागणी लक्षात घेऊन महामंडळाने ठाणे विभागातून आणखी ३३ विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ८३३पैकी ४४७ बस गाडय़ांमध्ये वैयक्तिक आरक्षण करण्यात आले आहे तर ३८६ बसगाडय़ांचे सामूहिकरीत्या आरक्षण करण्यात आले आहे.