कल्याण – शहापूर तालुक्यातील शहापूर-किन्हवली मार्गावरील समृद्धी महामार्गावरील उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून शहापूरजवळील शेलवली-शेरे गाव हद्दीत या उड्डाण पुलाचे काम सुरू होते. या पुलाच्या उड्डाण कामाच्या ठिकाणी उंच टेकडी आणि पाषाणाचे थर असल्याने हे काम करताना ठेकेदाराला शक्तिमान यंत्रणा दगडफोडीसाठी वापरावी लागत होते. या पुलाच्या कामासाठी शहापूर-किन्हवली, डोळखांब रस्ता मागील पाच ते सहा महिन्यांपासून बाजूच्या पर्यायी रस्त्यावरून वळविण्यात आला होता.

समृद्धी महामार्गाचा घोटी-कसारा-इगतपुरी, सरळांबे, फळेगाव ते भिवंडी-वडपे-आमणे हा ४९ किलोमीटरचा रस्ता शहापूर तालुक्यातून जात आहे. या रस्ते मार्गात शहापूर- किन्हवली मार्गावर शेलवली-शेरे गाव हद्दीत उड्डाण पुलाचे काम सुरू होते. हे काम आता पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा – प्रदूषण तपासणी केंद्रच चुकीच्या ठिकाणी; केंद्रांच्या जागेमुळे चुकीची आकडेवारी मिळत असल्याचा पालिकांचा दावा

हेही वाचा – डोंबिवली पश्चिमेत स्मशानभूमी बंद, नागरिकांची गैरसोय, दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रस्त्याचा शेलवली ते फळेगाव दरम्यानचे महत्त्वाचे रस्ते टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. या उड्डाण पुलामुळे समृद्धी महामार्गावर नाशिक-घोटीकडून येणारी वाहने पुलाखालून भिवंडीकडे धावणार आहेत. या पुलाच्या एका बाजूला उंच टेकडी आहे. या टेकडीचा बहुतांश भाग अखंड दगडाचा असल्याने हे खोदकाम करताना आणि तेथे रस्ते काम करताना ठेकेदाराला आव्हानात्मक परिस्थितीत काम करावे लागत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत समृद्धीचा शहापूर तालुक्यातील टप्पा खुला करण्याचे शासनाचे नियोजन आहे. शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गालगतच्या गावांमधील अनेक नागरिक टप्पे पूर्ण झालेल्या समृद्धी महामार्गावरून वाहनांच्या माध्यमातून येजा करत आहेत.