Manoj Jarange Patil Mumbai Protest – ठाणे : मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सुरू आहे. मागणी पूर्ण होण्यासाठी सुरू असलेले हे आंदोलन आणखी काही दिवस सुरू राहील अशी चिन्हे आहेत. या आंदोलनासाठी राजभरातील विविध खेडेगावातून मराठा बांधव सहभागी झाले आहेत. अशातच या आंदोलकांच्या जेवणाच्या सोयीसाठी राज्यभरातील गावांतून मदत केली जात आहे. नवी मुंबई सिडको भवनाबाहेर चपाती , भाकऱ्यांचा ढीग लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणी साठी मराठ्यांचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील ही २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करीत आहेत. या आंदोलनासाठी राजभरातील मराठा समाज एकवटला आहे. हे आंदोलन सुरवातीला एक दोन दिवसात आंदोलन संपेल असा अंदाज असल्याने तेवढीच शिदोरी आंदोलकांनी सोबत आणली होती. ती संपली असल्याचे कळल्या नंतर राज्यातील गाव खेड्यातून मदतीचा ओघ सुरू झाला. यामध्ये धान्य, चपाती, चटणी, लोणचे होते. ते सोमवारी पहाटे पासून सिडको प्रदर्शनी केंद्रात येत होते.
यात डाळी, कडधान्य, लोणचे विविध चटणी सोबतच गहू ज्वारी बाजरीचे पीठ, खाद्य तेल आदींचा समावेश आहे. या शिवाय लाखो चपाती ज्वारी बाजरीच्या भाकरी, तर अनेक भाजी होते. अशातच सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग लागल्याचे दिसून येत आहे. सिडको भवनाचा संपुर्ण परिसर या चपाती, भाकऱ्यांनी भरलेला आहे. तर अनके चटण्या, लोणची यांचा देखील यात समावेश आहे.
आंदोलकांची दिनचर्या अशी
मराठा आंदोलक मुंबईत मिळेल त्या जागेत राहून आंदोलन करीत आहेत. मात्र सततच पाऊस आणि मुंबईतील अडचणी लक्षात घेता आंदोलक नवी मुंबईत मुक्कामास परत येत आहेत. दररोज हा परतीचा प्रवास सुरू असतो. सिडको प्रदर्शनी केंद्रात किमान वीस हजार आंदोलक राहत आहेत. सकाळी उठून सर्व आवरून नंतर जेवण बनवणे, जेवणे, दुपारचे सोबत घेऊन मुंबईतील आंदोलन स्थळ गाठाणे आणि रात्री परत मुक्कामास नवी मुंबईत येणे अशी दिनचर्या सध्या आंदोलक करीत आहेत.
मराठा आरक्षण मागणी आंदोलनचा आज पाचवा दिवस आहे. आज जळगावातून अनेक मराठा आंदोलक नव्याने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. सुमारे वीस हजार पेक्षा अधिक आंदोलक नवी मुंबईत मुक्काम करतात आणि दिवसा आंदोलन स्थळी म्हणजेच मुंबईतील आझाद मैदानात जातात. या सर्वांसाठी खेडे गाव, शहरांमधून आलेले जेवण सिडको भवनाबाहेर ठेवण्यात आलेले आहे.