scorecardresearch

उल्हासनगर : इमारतीचा स्लॅब कोसळून चार मृत्युमुखी ; कॅम्प पाच भागातील घटना, बचावकार्य सुरू

गेल्या महिनाभरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Four killed slab collapse building ncident in Camp Five area in ulhasnagar rescue opretation started
उल्हासनगर : इमारतीचा स्लॅब कोसळून चार मृत्युमुखी ; कॅम्प पाच भागातील घटना, बचावकार्य सुरू

उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उल्हासनगर महापालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून कॅम्प पाच भागातील मानस टॉवर या इमारतीच्या चैौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर आला होता. यात एका कुटुंबातील तीन तर तळमजल्यावरील दुकानातील एका व्यक्तीचा असा चौघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या तीन अपघातात आतापर्यंत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.रविवारी उल्हासनगर शहरात एका जुन्या इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या बैठ्या घरावर पडल्याने एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच गुरूवारी दुपारच्या सुमारास कॅम्प पाच भागातील मानस टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्नीशमन दल, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाच मजली या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर आल्याची प्राथमिक माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही इमारत सुमारे २५ वर्षे जुनी असल्याची माहिती असून त्यातील अनेक सदनिका रिकाम्या होत्या. या स्लॅबखाली काही जण अडकले होते. बचावकार्य सुरू असताना चार जणांना बाहेर काढण्यात आले. या चौघांचाही मृत्यू झाल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.सागर ओचानी (१९), रेणू धनवानी (५५) धोलानदास धनवानी (५८) आणि प्रिया धनवानी (२४) अशी मृतांची नावे पालिका प्रशासनाने दिली आहेत. यात धनवानी या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याचे कळते आहे. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त होते आहे.

हेही वाचा : समृध्दी महामार्गात जमिनीचे तुकडे झाल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर मधील शेतकरी अडचणीत

गेल्या महिनाभरातील तिसरी घटना

गेल्या महिनाभरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक मजूर तर तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेत एका वृद्धाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर पालिकेच्या वतीने याही इमारतीला देण्यात आलेली नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे पालिका प्रकरणातून अंग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 15:58 IST